पनवेल : पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्वसामान्य नागरिकांना खारघर टेकडीवर प्रवेशबंदी असताना पनवेल महापालिकेच्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन २०२६’ला परवानगी देण्याच्या निर्णयावर नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर अखेर सिडकोने ही परवानगी मागे घेतली आहे. २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनमधील धावपटूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत सिडकोने बुधवारी (५ ऑगस्ट) महापालिकेला याबाबत पत्र दिले. त्यामुळे महापालिकेला आता मॅरेथॉनच्या आयोजनाचे नियोजन बदलावे लागणार आहे.

पावसाळ्यात खारघर टेकडी परिसरात दरड कोसळणे, मोठे दगड रस्त्यावर येणे तसेच झाडे उन्मळून पडण्याचा धोका असल्याने सिडकोने टेकडीवरील रस्ता सर्वसामान्यांसाठी बंद केला आहे. फणसवाडी आणि चाफेवाडी येथील ग्रामस्थांना यातून वगळण्यात आले आहे. नियमितपणे सकाळी चालण्यासाठी टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांनाही प्रवेश नाकारण्यात येत आहे.

असे असताना पनवेल महापालिकेने २३ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन २०२६’ला सिडकोने यापूर्वी परवानगी दिली होती. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षिततेचे कारण देत प्रवेश नाकारला जात असताना शेकडो स्पर्धकांचा सहभाग असलेल्या मॅरेथॉनला परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न सकाळच्या वेळेला या डोंगररांगामध्ये धावणा-या आणि चालणा-या नागरिकांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर खारघर हिल वेल्फेअर असोसिएशन आणि सजग नागरिक मंचाच्या वतीने रविवारी (२ ऑगस्ट) सिडकोच्या प्रवेशबंदीविरोधात आंदोलन करण्यात आले. अनेक नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

सुरक्षिततेचा नियम असेल तर तो सर्वांसाठी समान असावा. काही खासगी विकासक, कंत्राटदार किंवा अन्य घटकांना प्रवेश देऊन सर्वसामान्यांना मात्र रोखले जाऊ नये, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांनी याबाबत नियमाप्रमाणे निर्णय घेण्याची सूचना अधिका-यांना दिली होती. त्यानूसार बुधवारी सिडकोच्यावतीने महापालिकेला पत्र पाठवून मॅरेथॉनची परवानगी रद्द केल्याचे पत्र देण्यात आले. पावसाळ्यात खारघर टेकडीवरील रस्त्यावर मोठे दगड कोसळण्याच्या घटना घडल्या असून, त्याची छायाचित्रेही पत्रासोबत जोडण्यात आली आहेत.

अशा घटना पुन्हा घडल्यास मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंना दुखापत होण्याची शक्यता असल्याचे सिडकोने म्हटले आहे. सततचा पाऊस आणि धावपटूंच्या सुरक्षिततेचा विचार करून २३ ऑगस्टच्या मॅरेथॉनसाठी दिलेली परवानगी मागे घेण्यात येत असल्याचे सिडकोचे कार्यकारी अभियंता बी. बी. जोशी यांनी पत्रात नमूद केले आहे. ३० सप्टेंबरनंतर मॅरेथॉन आयोजित करायची असल्यास महापालिकेने नव्याने परवानगीसाठी अर्ज करावा, असेही सिडकोने स्पष्ट केले आहे.