पनवेल : डोंगररांगा सर करणारी मॅरेथॉन स्पर्धा खारघरमध्ये पनवेल महापालिकेने आयोजित केली आहे. या मॅरेथॉनमध्ये खारघरच्या डोंगररांगांमधील चढ-उतार पार करत तब्बल ४२.१९५ किलोमीटर अंतर धावण्याचे आव्हान मॅरेथॉनपटूंसमोर असेल. पनवेल महापालिकेतर्फे प्रथमच २३ ऑगस्ट रोजी ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत पाच हजार इच्छुकांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे.

पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर विविध सामाजिक संदेश देण्यासाठी महापालिकेने अनेक मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन केले. मात्र, प्रथमच ४२.१९५ किलोमीटर अंतराच्या पूर्ण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई मॅरेथॉनएवढेच या स्पर्धेचे अंतर असले, तरी खारघरच्या टेकड्यांवरील चढ-उतार हे स्पर्धकांसाठी मोठे आव्हान असणार आहे. मार्गावर सुमारे एक मीटर, ७५ मीटर, १५० मीटर आणि सर्वाधिक २२५ मीटर उंचीपर्यंतच्या चढ-उतारांचा सामना स्पर्धकांना करावा लागणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ असे नाव देण्यात आले आहे.

स्पर्धेतील सर्वाधिक कसोटीचा टप्पा १३ किलोमीटरचा असून, या मार्गावर सलग धावत सुमारे दीडशे मीटर उंचीपर्यंतचा खडतर चढ स्पर्धकांना पार करावा लागणार आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ अंतर्गत प्रायोजकांच्या सहकार्याने महापालिकेने या स्पर्धेचे आयोजन केले असून समाजमाध्यमांद्वारे त्याचा प्रचार सुरू आहे.

हेही वाचा

स्पर्धकांची सुरक्षितता

स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी चार वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णवाहिका आणि आरोग्यसेवकांची पथके तैनात करण्यात येणार आहेत. मार्गावर १९ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, तर १० ठिकाणी स्पर्धकांना ऊर्जा मिळण्यासाठी अल्पोपाहाराची व्यवस्था केली जाणार आहे.

स्पर्धेचे टप्पे

पूर्ण मॅरेथॉनबरोबरच २१.०९७५ किलोमीटरची अर्धमॅरेथॉन तसेच १०, पाच आणि तीन किलोमीटरचे स्वतंत्र टप्पे ठेवण्यात आले आहेत. सहभागींसाठी प्रकारानुसार १०० रुपयांपासून १,३५० रुपयांपर्यंत नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. या स्पर्धेला सूमारे १० हजारांहून अधिक खेळाडू येण्याची अपेक्षा आहे. नावनोंदणी शुल्कातून जमा होणारे शुल्क आणि महापालिकेचा निधी असा सूमारे दोन कोटी रूपये खर्च या मॅरेथॉनसाठी महापालिका करणार आहे.

स्पर्धेचा मार्ग

स्पर्धेसाठी महापालिकेने सिडकोची परवानगी घेतली आहे. खारघरमधील सेंट्रल पार्क येथून स्पर्धेला सुरुवात होईल. तेथून खारघरच्या अंतर्गत रस्त्यांमार्गे भारती विद्यापीठ, खारघर डोंगररांगा आणि पुन्हा परतीच्या मार्गाने सेक्टर ३४ परिसराला वळसा घालून सेंट्रल पार्क येथे स्पर्धेचा समारोप होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना https://stridersevents.in/events/info?KhargharHillMayor’sMarathon2026 या संकेतस्थळावर नावनोंदणी सुरू आहे.

खेळाडूंमध्ये उत्साह

नवी मुंबई, मुंबई उपनगरासह राज्य, देशातून तसेच विविध परदेशी मॅरेथॉनपट्टू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे सांगीतले जात आहे. जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या ८६ किलोमीटरच्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सिडकोचे ४५ वर्षीय वसाहत अधिकारी अभिजित राठोड यांनी सलग दुसऱ्यांदा यशस्वीरीत्या शर्यत पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याच स्पर्धेत यापूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनीही सहभाग नोंदवून स्पर्धा पूर्ण केली होती.