पनवेल : खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये पहाटे साडेचार वाजता झेंडा उंचावताच सुरू झालेल्या खारघर महापौर हिल मॅरेथॉनमध्ये सुमारे नऊ हजार धावपटूंनी सहभाग घेतला. पनवेल महानगरपालिकेने प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेत ४२ किलोमीटरपासून तीन किलोमीटरपर्यंतच्या विविध गटांत धावपटूंनी सहभाग नोंदविला. ४२ किलोमीटरच्या मुख्य शर्यतीत पुरुष गटात निलेश दगडू आर्सेकर यांनी २ तास ५४ मिनिटे ८ सेकंदांत, तर महिला गटात शिवानी चौरसिया यांनी ३ तास २८ मिनिटे ४४ सेकंदांत अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला.

पहाटे साडेतीन वाजल्यापासून सेंट्रल पार्क परिसरात धावपटूंची गर्दी सुरू झाली होती. पहिल्या टप्प्यात साडेचार वाजता ४२ किलोमीटरची शर्यत सुरू झाली. त्यानंतर साडेपाच वाजता २१ किलोमीटरची शर्यत, तसेच पुढे १०, पाच आणि तीन किलोमीटरच्या शर्यती घेण्यात आल्या. ४२ किलोमीटरसाठी सुमारे ३५०, २१ किलोमीटरसाठी १,३००, १० किलोमीटरसाठी १,८००, पाच किलोमीटरसाठी ३,००० आणि तीन किलोमीटरसाठी २,००० धावपटूंनी सहभाग घेतला. अपंगांच्या गटातही शंभरहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदविला.

२१ किलोमीटरच्या शर्यतीत पुरुष गटात सुमित मोरे यांनी १ तास १६ मिनिटे २ सेकंदांत, तर महिला गटात विनिता पाल यांनी १ तास ३७ मिनिटे ८ सेकंदांत अंतर पूर्ण केले. १० किलोमीटरच्या शर्यतीत पुरुष गटात अजय पाल यांनी ३३ मिनिटांत, तर महिला गटात अमृता पटेल यांनी ३८ मिनिटे १७ सेकंदांत शर्यत पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला.

kharghar-mayor-hill-marathon-panvel-news
खारघर महापौर हिल मॅरेथॉनच्या प्रारंभी सेंट्रल पार्क परिसरात जमलेला धावपटूंचा प्रचंड जनसागर आणि उत्साह.(छायाचित्र:लोकसत्ता टीम)

धावपटूंसाठी वैद्यकीय मदत, नोंदणी, अल्पोपाहार आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस, महापालिका वॉर्डन, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक आणि स्वयंसेवकांनी बंदोबस्त ठेवला. ड्रोनच्या माध्यमातून स्पर्धेचे चित्रण करण्यात आले. अभिनेता अंकुश चौधरी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला. ४२ किलोमीटरची ही देशातील पहिली हिल मॅरेथॉन असल्याचा दावा महापौर नितीन पाटील यांनी केला. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त एआयएमएस प्रमाणक मिळाले आहे.

महापौर नितीन पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर, सभागृह नेते अॅड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे आदी उपस्थित होते.