पनवेल – खारघरमधील एका नामवंत गृहनिर्माण सोसायटीत सुरू असलेल्या दुरुस्ती कामातील कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एका ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला आपला एक डोळा गमवावा लागल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. काम करताना आवश्यक सुरक्षा उपाय न केल्यामुळे घडलेल्या या अपघाताने सोसायट्यांमधील बांधकाम व दुरुस्ती कामांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात संबंधित कंत्राटदार कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर उपनगरातील सेक्टर ४ येथील रेलविहार गृहनिर्माण सोसायटीमध्ये इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. २२ जानेवारी रोजी सकाळी सुमारे पावणेबारा वाजता सोसायटीत राहणारे ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आपल्या घराजवळ असताना अचानक कामासाठी वापरण्यात येणारा बांबू उडून त्यांच्या चेहऱ्यावर आदळला.
या अपघातात त्यांच्या डोळ्याला आणि हनवटीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमी ज्येष्ठ नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले असले तरी या दुर्घटनेत त्यांचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे संबंधित ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक आणि शारीरिक धक्का बसला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी चौकशी सुरू केली. ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीनंतर रेल विहार सोसायटीत कोणतेही आवश्यक सुरक्षा नियम न पाळता काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी वर्साटाईल ग्रुपच्या कंत्राटदाराविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (२) अंतर्गत हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, सोसायटी परिसरात काम करताना कंत्राटदारांनी सुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे

