पनवेल : खारघरमध्ये रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या तरूणींना लाल रंगाच्या थार जीपमधून त्रास देण्याच्या दोन घटना बुधवारी एकाच रात्री घडल्या. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीवूड्स येथून ३० वर्षीय थारचालकाला कोपरखैरणे येथून गुरूवारी रात्री ताब्यात घेतले. या दोन्ही घटनांची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

पहिली घटना बुधवारी (ता ३० सप्टेंबर)  रात्री साडेदहा वाजता सोमानी शाळा ते पेठपाडा मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. सेक्टर ३४ येथे राहणारी २६ वर्षीय तरुणी पायी जात असताना तिच्यासमोर लाल रंगाची थार आली. जीपमधील मुखपट्टी लावलेल्या व्यक्तीने तरुणीच्या छातीवर हात मारून तेथून पलायन केले. घाबरलेल्या तरुणीने खारघर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. दुसरी घटना त्याच रात्री साडेअकराच्या सुमारास सेक्टर ३ येथील बेलपाडा भागातील सनसिटी इमारतीसमोर घडली. २२ वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, अनोळखी थारचालकाने विनयभंग करण्यासाठी भरधाव वेगाने येऊन त्या तरूणीला धडक दिली. यात ती पिडिता जखमी झाली.

दोन्ही तक्रारी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी रात्रपाळीतील पोलिसांना थारचालकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुद्धा यामध्ये संबंधित जीपचालकाचा शोध सुरू केला. बेलपाडा गावाजवळील आणि सोमानी स्कूल जवळील असंख्य सीसीटिव्ही कॅमेरांमधून शोध घेतल्यानंतर या जीपचालकाला शोध लावण्यात पोलिसांना यश आले. 

पोलिसांच्या तपासात सीवूड्स येथे राहणारा अली अहसान नक्वी हा ३० वर्षीय विवाहित तरुण भरधाव वेगाने जीप चालवून तरूणींचा विनयभंग करत असल्याची ओळख पटल्यानंतर त्याची शोध मोहीम पोलिसांनी राबवली. संशयित आरोपी अली अहसान नक्वी हा अखेर गुरूवारी रात्री कोपरखैरणे येथे पोलिसांना सापडला. तो रात्रीचा थारजीप चालवून पायी चालणा-या तरूण मुलींना लक्ष्य करत असल्याचे तपासात समोर आले. नक्वी याचा पेट्रोल ठेवण्याच्या नवीन टाकी बनविण्याचे व्यवसाय आहे. तर त्याच्या वडिलांचे भिवंडी येथे लॉजिस्टिक गोदाम असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. खारघरच्या दोन वेगवेगळ्या सेक्टरमध्ये एकाच रात्री या घटना घडल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. यापूर्वीही अली नक्वी याने असे कृत्य केले का याची चौकशी पोलीस त्याच्याकडे करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी दिली.