नवी मुंबई : गेल्या वर्षी दिवाळीत नागरिकांच्या आंदोलनानंतर सुरळीत झालेला खारघर सेक्टर ३६ मधील स्वप्नपूर्ती संकुलाचा पाणीपुरवठा फेब्रुवारीच्या एक तारखेपासून बिघडला. गेल्या आठवड्यापासून अत्यल्पगटाच्या घरांमध्ये तीन-तीन दिवस पाणीच न आल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. संकुलातील बहुतांश इमारतीत एक तासाहून कमी पाणी तसेच सोमवारची पाणीकपात शुक्रवारपासून असा जाच सुरू झाला आहे. याबाबत पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची नोटिस रहिवाशांकडून सिडकोला देण्यात आली आहे.
‘सिडकोकडून तुमच्या पसंतीचे घर’ ही जाहिरात सध्या नवी मुंबईतील बहुतांश रेल्वे स्थानकांवर लक्षवेधी ठरत आहे. मात्र लोकांनी आधीच त्यांच्या पसंतीच्या घेतलेल्या ‘स्वप्नपूर्ती’ या संकुलांतील घरांत चोवीस तास पाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात सिडको प्रशासन वेळोवेळी अपयशी ठरत आहे. गेल्यावर्षी ऐन दिवाळीमध्ये येथील नागरिकांनी सिडकोविरोधात मोर्चा, हंडा मोर्चा नेला. त्यानंतर सिडको प्रशासनाकडून पाणी सुरळीत करण्यात आले. मात्र जानेवारीच्या अखेरपासून पाण्याची अनियमित, अनिश्चित कालावधीसाठी कपात सुरू झाली.
अत्यंत कमी दाबाने पुरवठा केला जात आहे. फेब्रुवारीच्या आठवड्यापासून हळूहळू पाणी पाच तासांहून एक तासावर आणि आता त्यापेक्षा कमी होत आहे, असे येथील महेश गीते यांनी सांगितले. फेब्रुवारी महिना झाल्यापासून पिण्याचे पाणी दररोज विकत आणण्याची वेळ आली आहे. तासभरही पाणी उरत नसल्याने अनेक इमारतींमध्ये कार्यालयासाठी सकाळी निघून जाणाऱ्या नागरिकांना पाणीच मिळत नाही. घरी असणाऱ्यांनाही पुरणार नाही इतका जेमतेम पाणीपुरवठा असतो. त्यामुळे संध्याकाळी कार्यालयातून आलेल्यांना कोणत्याही वेळी पाणी मिळत नाही. पाण्यावरून वाद, गैरसमज आणि भांडणे यांचे प्रमाण वाढत आहे.
मूलभूत हक्कांवर गदा
याबाबत स्वप्नपूर्ती रहिवाशांनी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, २०१५ अनुसार पाणीपुरवठा अनियमित करण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नोटिसद्वारे केली. तसेच पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, अडथळ्यांचे कारण आणि कायमस्वरूपी उपाययोजना यांबाबत लेखी अहवाल द्यावा अशी विनंतीही सोमवारी केली. पाण्यासाठी पुन्हा आंदोलन आणि वेळ पडल्यास न्यायालयीन लढाईच्या पवित्र्यात आता नागरिक आहेत. खारघरमधील स्वप्नपूर्ती परिसरात करून तातडीने सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
– प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको
हजारो नागरिकांनी येथे सिडकोची घरे घेतली. खारघरमधील संकुल पाण्याबाबत कधीही समस्याग्रस्त नव्हते. आजूबाजूला गगनचुंबी इमारती वाढल्यानंतर, इतर गावांना देण्यासाठी आमच्याच संकुलातील पाणी पळविण्यात आले. ‘टँकर्स लॉबी’च्या हातात पाणी गेल्यानंतर सिडकोची ही घरे ‘पसंती’ची राहतील काय? नीलेश पाटील, रहिवासी
