पनवेल – खारघर येथे होणाऱ्या ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त मोठ्या संख्येने भाविक व मान्यवर वाहनांनी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने खारघर परिसरात विशेष वाहतूक नियमन लागू केले आहे. २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत काही प्रमुख मार्गांवर प्रवेशबंदी, पर्यायी मार्गांची व्यवस्था तसेच ‘नो पार्किंग’चे नियम लागू राहणार आहेत.

नवी मुंबई पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार ही अधिसूचना जारी केली आहे. समागमाच्या ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक सुरळीत व नियंत्रित ठेवण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिसूचनेनुसार, खारघरमधील ग्रामविकास भवन ते गुरुद्वारा चौक ते जे कुमार सर्कल या मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. उत्सव चौकाकडून येणाऱ्या वाहनांनी ग्रामविकास भवन येथे उजवीकडे वळून ग्रीन हेरिटेज चौक मार्गे पुढे जावे, तर तळोजा कारागृहाकडून येणारी वाहने ओवेगाव चौक येथून डावीकडे वळून प्रशांत कॉर्नर मार्गे इच्छित स्थळी जावीत, असे पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत.

तसेच, ओवेगाव पोलीस चौकी ते जे कुमार सर्कल या मार्गावरही प्रवेशबंदी लागू राहणार आहे. ओवेगाव चौकाकडून येणारी वाहने ओवेगाव पोलीस चौकी–प्रशांत कॉर्नर मार्गे जातील, तर ग्रीन हेरिटेज चौकाकडून येणाऱ्या वाहनांनी जे कुमार सर्कल येथे वळून बी. डी. सोमाणी शाळा मार्गे प्रशांत कॉर्नरकडे जावे. ओवेगावात जाण्या-येण्यासाठी जुना रोडकट, इम्पिरियन शाळेसमोरील रस्ता व ओवेगाव चौकातील कमानीचा वापर करता येणार आहे.

याशिवाय, ओवेगाव चौक ते गुरुद्वारा चौक हा मार्ग (टाटा हॉस्पिटल कडून ये-जा करणारी वाहने वगळता) बंद राहणार आहे. या कालावधीत खारघर व लगतच्या परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी ‘नो पार्किंग’ लागू करण्यात आले आहे.

दरम्यान, समागमासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी खारघरमध्ये सुमारे ३० ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी पार्किंग क्षेत्रातून भाविकांना आणणाऱ्या बसेस व वाहने, तसेच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांतील वाहने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.

प्रशासन व पोलिसांनी नागरिक व भाविकांना वाहतूक नियमांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.