पनवेल – बाहेर मुसळधार पाऊस सुरू असतानाही खारघर उपनगरातील अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा कायम असल्याने संतप्त रहिवाशांनी सोमवारी बेलापूर येथील रायगड भवनातील सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर धाव घेतली. पावसाळ्यातही अपुरा पाणीपुरवठा आणि नियमित शटडाऊनमुळे नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

खारघर सेक्टर-१५ मधील स्पॅगेटी, पारिजात, प्रियदर्शनी आणि प्राइमरोज या गृहनिर्माण संस्थांतील सुमारे १५० हून अधिक रहिवासी आंदोलनात सहभागी झाले होते. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका महिलांना आणि लहान मुलांना बसत असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी एका महिलेने आपल्या चिमुकलीला खांद्यावर घेऊन सिडको अधिकाऱ्यांना पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारला. अपु-या पाणी पुरवठ्यामुळे मुलांच्या शाळा बुडत असल्याने ही पिढी कशी घडणार असा प्रश्न करून अधिका-यांना गार केले. या प्रसंगामुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.महिलांनी घर कसे चालवावे, वेळेत पाणी न येत असल्याने सकाळचे आंघोळ पाणी, मुलांचे व कामावरील व्यक्तींसाठीचे जेवणाचे डब्बे कसे बनवावे असा प्रश्न संतप्त महिलांनी सिडकोच्या अधिका-यांना विचारला. खारघर उपनगरामध्ये पावसाळ्यातही १५ दश लक्ष लीटर पाण्याचा तुटवडा आहे. यामुळे घराबाहेर पाऊस मात्र पिण्याच्या नळाला पाणी नाही अशी स्थिती निर्माण झाल्याने नागरिक संतापले आहेत.  स्पॅगेटी ही गृहनिर्माण संस्था सिडकोने उभारलेली असून, सिडकोच्या इमारतींनाच पावसाळ्यात पुरेसे पाणी मिळत नसल्याबद्दल महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यातही दर सोमवारी शटडाऊन घेतला जात असून, अपुरा पाणीपुरवठा का केला जात आहे, असा सवाल नागरिकांनी अधिकाऱ्यांना केला.

या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे पनवेल महापालिकेचे नगरसेवक समीर कदम आणि उषा अडसूळे यांनी केले. महापालिका, राज्य आणि केंद्रात सत्ता असतानाही सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सिडकोला जाग आणण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याची प्रतिक्रिया समीर कदम यांनी व्यक्त केली.

यानंतर सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भगवान गायकवाड यांच्यासोबत रहिवासी आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. नवी मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेली पाणीपुरवठ्यातील कपात अद्याप कायम असून, ती रद्द करून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी सिडकोने नवी मुंबई महापालिकेकडे केल्याची माहिती गायकवाड यांनी बैठकीत दिली. तसेच पुढील १५ दिवसात परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.