खिडक्यांवर धूळ, तेलकट थर

कोकण भवन येथील उपाहारगृहात अस्वच्छ वातावरणातच विविध अन्नपदार्थ तयार केले जात आहेत. उपाहारगृहाची वेळच्या वेळी साफसफाई केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

शासनाच्या या उपाहारगृहात कमी दरात पदार्थ दिले जातात, मात्र अस्वच्छतेमुळे आरोग्याशी खेळ केला जात आहे. किचनच्या खिडक्यांवर तेलकट थर जमले आहेत. हे थर आणि धूळ कधीही अन्नपदार्थात पडण्याची शक्यता असते. या उपाहारगृहात रोज २ हजार नागरिक येतात, मात्र या नागरिकांची आणि संपूर्ण उपाहारगृहाच्या सफाईची भिस्त अवघ्या २ कर्मचाऱ्यांवर असते. कोकणभवनाच्या सफाईसाठी एकूण १०० कर्मचारी आहेत, मात्र ते उपाहारगृहाची स्वच्छता ही आपली जबाबदारी नसल्याचे सांगतात.

या उपाहारगृहातील अधिकारी व कर्मचारी कामानिमित्त बाहेर गेले असल्याने येथे सध्या अस्वच्छता आहे, असे कारण पुढे करण्यात आले. कमर्चारी जर दोन दिवसांपूर्वीच बाहेर गेले असतील तर खिडक्यांवर तेलाचे जाडसर थर कसे, हा प्रश्न उपस्थित होतो. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, येथे पूर्वी ६० कर्मचारी होते, मात्र आता फक्त ३५ कर्मचारीच आहेत आणि त्यातील १७ कर्मचारी अधिवेशनाच्या कामानिमित्त गेले आहेत. येथे रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सर्व ताण येथील कर्मचाऱ्यांवर पडत आहे.

येथील उपाहारगृहात अल्पदरात नाश्ता, जेवण मिळते, मात्र त्याचबरोरबर स्वयंपाकघरातही स्वच्छता ठेवली गेलीच पाहिजे. या उपाहारगृहाची साफसफाई करणे अतिशय गरजेचे आहे.

–  सुनीता दिवे, नागरिक