हळदी समारंभात डीजेचा दणदणात करावा की टाळावा, यावरून प्रकल्पग्रस्तांमध्ये दोन गट पडल्याचे नुकत्याच झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत उघडकीस आले. कोपरखैरणे येथे गेल्या आठवडय़ात एका हळदी सभारंभात रात्री उशिरापर्यंत डीजेचा दणदणाट सुरू होता. त्यावर कारवाई करणास गेलेले पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात हाणामारी झाली. या पाश्र्वभूमीवर हळदी सभारंभ आटोपते घ्यावेत, अशी भूमिका मांडणाऱ्या काही ग्रामस्थांनी मांडली, मात्र त्याला विरोध होत आहे. त्यामुळे हळदी संभारंभावरून प्रकल्पग्रस्तांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईत आगरी कोळी समाज मोठय़ा प्रमाणात आहे. सध्या या समाजात लग्न सोहळ्यांचा काळ सुरू आहे. सुरू असून लग्नाच्या एक दिवस आधी होणारा हळदी समारंभ हा या समाजात फार महत्वाचा मानला जातो. मद्यपान आणि मांसाहर हा या सोहळ्याचा अविभाज्य घटक मानला जातो. रात्री उशिरापर्यंत वाद्यांच्या तालावर नाचगाणे सुरू राहते. पूर्वी या नाचगाण्यासाठी बँन्जो पथक बोलावले जात असे. मात्र अलीकडे डीजेचा दणदणाट होऊ लागला आहे.  त्यात नवी मुंबईतील सर्व गावांच्या चारही बाजूने नागरीकरण झाल्याने शहरी नागरिकांना हा दणदणाट सहन होत नाही. ते पोलीस ठाण्यात तक्रार करतात.

गेल्या आठवडय़ात कोपरखैरणे येथे असाच प्रकार झाल्याने पोलिसांच्या सूचनेनंतर डीजे बंद न करणाऱ्यांची पोलिसांशी हाणामारी झाली. त्यात दोन पोलिस व तीन ग्रामस्थ जखमी झाले. त्यामुळे शनिवारी सर्व ग्रामस्थ मंडळांनी कोपरखैरणे येथे एक बैठक घेऊन हे प्रकार टाळण्यासाठी हळदी सभारंभ रात्री १०च्या आत उरकावा अशा सूचना मांडल्या. त्याला काही तरुणांनी विरोध केला.

आमच्या परंपरा सुरूच राहतील!

आमच्या जमिनीवर शहर वसले आहे. आमच्या परंपरा आम्ही बंद का कराव्यात, असा सवाल या तरुणांनी केला. शहरात चालणारे सार्वजनिक गणेशोत्सव नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती यात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते, तर ग्रामस्थांच्या उत्सव, सोहळ्यांनाही सहकार्य करावे, असे मत त्यांनी मांडले. सरकार नवरात्रीत दोन दिवस १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्यास मुभा देते, मग ग्रामस्थांना हळदीसाठीही सवलत द्यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koparkhairane police villagers clash over dj party
First published on: 26-04-2017 at 01:57 IST