संतोष जाधव
नवी मुंबई : शहरात महापालिकेची एकही प्रयोगशाळा नसल्याने खासगी प्रयोगशाळेत रुग्णांची लूट सुरू होती. करोनाकाळात नेरुळ येथील पालिका रुग्णालयात प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा पुढील काळात इतर दुर्धर आजारांच्या चाचण्यांसाठी सेवा देणार असून आणखी वाशी व ऐरोली रुग्णालयांत स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्याचे नियोजन पालिका प्रशासन करीत असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
करोनापूर्वी नवी मुंबई पालिकेची आरोग्य सुविधा तोकडी होती. त्यामुळे करोनाचे संकट आल्यानंतर अनेक आरोग्य सुविधांची गरज भासल्यानंतर त्या सुविधा निर्माण करण्यात आल्या. त्यात महत्त्वाचे म्हणजे नेरुळ येथील रुग्णालयात प्रयोगशाळा उभारण्यात आली. त्यामुळे करोनाकाळात या प्रयोगशाळेची मोठी मदत झाली आहे. आता ही प्रयोगशाळा करोना परिस्थिती कशी राहील यावर पुढील काळात ती इतर दुर्धर आजारांसाठीही कायमस्वरूपी उपयोगात येणार आहे. मात्र शहरात पालिकेची वाशीसह नेरुळ, बेलापूर व ऐरोली येथे रुग्णालये आहेत तेथेही बाह्यरुग्ण सेवेसह इतर आरोग्य सुविधांत वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रत्येक रुग्णालयात रुग्णसेवेचा ताण वाढणार आहे. यामुळे नेरुळची एकच प्रयोगशाळा कमी पडू शकते. त्यामुळे करोनासह विविध चाचण्यांसाठी पालिकेच्या वाशी व ऐरोली रुग्णालयांतही स्वतंत्र प्रयोगशाळा निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे सामान्यांना चाचण्यांसाठी खर्चाची बचत होणार आहे.
करोनाकाळात अल्पावधीत नेरुळ येथील रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र व अद्ययावत प्रयोगशाळेमुळे तत्काळ निदान व तत्काळ उपचार यामुळे करोनावर नियंत्रण मिळवता आले. या एकाच प्रयोगशाळेवर भविष्यातील ताण पडणार नाही यासाठी वाशी व ऐरोली येथील रुग्णालयांतही प्रयोगशाळा सुरू करण्याचा मानस आहे. – अभिजित बांगर, आयुक्त