देवेंद्र फडणवीस यांची टीका

नवी मुंबई:  महाराष्ट्रातील सत्ताधारी एखादा निर्णय घेतात तर परत तात्काळ बदलतात, निर्णयाबाबत परिपत्रक काढतात व ते परत घेतात. राज्यातील मंत्र्यांमध्ये व प्रशासनात समन्वय नाही. सरकारमध्ये प्रत्येक बाबतीत घोळ सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या राज्य सरकारला घोळ सरकार म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे केली आहे.

माथाडींचे नेते कै. अण्णासाहेब पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त शनिवारी नवी मुंबईतील वाशी येथील माथाडी भवन येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. माथडींचे नेते नरेंद्र पाटील आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया होण्याआधीच दलालांमार्फत पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे हे दलाल कोण आहेत हे सरकारने शोधून काढले पाहिजे सातत्याने परीक्षा रद्द होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष असून वेळ पडल्यास या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात भाजप सरकारच्या काळात कामगारांचे अनेक प्रश्न सोडविले. आणखी काही काळ मिळाला असता तर माथाडींचे उरलेले प्रश्नही सोडवले असते असे फडणवीस यांनी नमूद केले.