मोठय़ा बंदोबस्तात पालिका व सिडकोची कारवाई
नवी मुंबई : यापूर्वीच्या कारवाईत दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठया बंदोबस्तात कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यालगतच्या झोपडय़ांवर तोडक कारवाई केली. यात सुमारे ११६ बेकायदा झोपडय़ा निष्कासित केल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. यापूर्वीही अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. मात्र पुन:पुन्हा या झोपडय़ा उभ्या राहत असल्याने हा प्रश्न गंभीर झाला आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेरील सिडकोच्या भूखंडावर या बेकायदा झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी पदपथासह रस्ताही काबीज केला आहे. या झोपडपट्टीवासीयांचे काही दैनंदिन व्यवहार हे उघडय़ावरच सुरू असतात. रात्रीच्या वेळी तर रस्त्यालगत झोपलेले असतात. यामुळे अपघाताची शक्यता असून वाहतुकीलाही मोठा अडथळा होत असतो.
२०१८ मध्ये सिडको आणि महापालिका यांनी संयुक्त कारवाई केली होती. मात्र या कारवाईला विरोध करीत झोपडपट्टीवासीयांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. जेसीबीची देखील तोडफोड केली होती. यात दोन पोलीस आधिकारी जखमी झाले होते. त्यामुळे मोठया बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. या ठिकाणच्या भूखंडावर नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या झोपडपट्टीधारकांनी उर्वरित भूखंड आणि पदपथावर बस्तान मांडले आहे. याठिकाणी शाळा महाविद्यालये आहेत. तसेच वाशी, तुर्भे कोपरखैरणेला जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांची वर्दळ असते. परंतु बेकायदा झोपडय़ा पदपथावर उभारल्याने पादचारी यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे गुरुवारी पालिका व सिडको प्रशासनाने २५०-३०० जणांच्या पोलीस बंदोबस्तात या झोपडय़ांवर कारवाई केली. २५ ते ३०अधिकारीही यावेळी उपस्थित होते. शंभरहून अधिक झोपडय़ा या वेळी निष्कासित करण्यात आल्या. ही कारवाई होणार असल्याने पोलिसांनी परिसरातही मोठा बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीचे मार्गही बदलण्यात आले होते. परिसरातील सर्व दुकानेही बंद ठेवण्यात आली होती.
२०१८ मध्ये कारवाई दरम्यान येथील झोपडपट्टीवासीयांनी विरोध करीत दगडफेक केली होती. त्यामुळे गुरुवारी मोठय़ा बंदोबस्तात पुन्हा कारवाई करण्यात आली आहे. सुमारे ११६ झोपडय़ांवर कारवाई करण्यात आली आहे.
– प्रशांत गावडे, विभाग अधिकारी, कोपरखैरणे
