पनवेल : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे पनवेल-मुंब्रा महामार्गावर मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या पाण्याचा वापर वाहनचालक तसेच व्यवसायिकांकडून होत आहे.

पाण्याच्या कमतरतेमुळे पनवेल शहरामध्ये सध्या आठवडय़ातून एक दिवस कोरडा पाळला जात आहे. तर खारघर व तळोजा वसाहतीमध्ये पाण्याची समस्या मोठी आहे. मात्र पनवेल-मुंब्रा महामार्गावर जलवाहिनीतून गळतीमुळे पाणी वाया जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सध्या अमृत योजनेच्या माध्यमातून पनवेल परिसराला पाणी संपन्न करण्याचे धोरण आखले आहे. याच कामाचा एक भाग म्हणून नवीन पनवेल येथील डीमार्ट ते कळंबोलीपर्यंत जलवाहिनी या दरम्यान अनेक वर्षांपासूनची जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सुमारे १६०० मीटर लांबीचा आणि ११६८ व्यास असलेली जलवाहिनी बदलण्यापूर्वी या जलवाहिनीला रंग देण्याचे काम सुरू असून हे काम मे अखेपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. तोपर्यंत ही गळीत थांबवण्याची मागणी होत आहे.
नवीन पनवेल येथील डीमार्ट ते कळंबोली सर्कल व त्यापुढील जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. जलवाहिनी उपलब्ध झाली असून या जलवाहिनीला आतून व बाहेरून गंज लागून खराब होऊ नये यासाठी रसायनमिश्रित रंग लावण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण झाल्यावर जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले जाईल. हे काम अमृत योजनेअंतर्गत होत आहे. – विजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, एमजेपी