नवी मुंबई : सलग तिसरा आठवडा लिंबाच्या दरात वाढ सुरू असून मार्च महिन्यात प्रतिकिलो ४० ते ६० रुपये असलेला दर शुक्रवारी १५० ते १७० रुपयांपर्यंत गेला आहे. घाऊक बाजारातच दर वाढल्याने किरकोळ बाजारात लिंबू प्रतिनग दहा ते पंधरा रुपयांपर्यंत गेले आहे. त्यामुळे बहुतांश विक्रेते आता लिंबू घेत नसल्याने किरकोळ बाजारातूनही लिंबू गायब झाल्याचे चित्र आहे.
त्यात कडक उन्हाळा सुरू असल्याने लिंबाला मोठी मागणी आहे. मात्र बाजारात मागणीच्या तुलनेत आवक होत नसल्याने दर वाढले आहेत. मागील आठवडय़ाच्या तुलनेत ५०० क्विंटल आवक घटली आहे.
प्रतिनग दहा रुपये लिंबू मिळत आहे. एवढे महाग लिंबू कोण घेणार नाही, म्हणून आम्ही आता लिंबू विक्रीसाठीच आणत नाही, असे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले.
मार्च महिन्यामध्ये घाऊक बाजारात लिंबू प्रतिकिलो ४० ते ६० रुपये इतके दर होते. त्यानंतर त्यात वाढ होत ६० ते १०० रुपये झाली. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उन्हाचा कडका वाढल्याने लिंबाला मागणी वाढल्याने दर आणखी वाढत प्रतिकिलो १२० ते १५० रुपयांपर्यंत गेले. आता यात आणखी वाढ होत १५० ते १७० रुपये प्रतिकिलो, तर प्रति क्विंटल ७ हजार ते १० हजार रुपये बाजार भाव आहेत .
ही दरवाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. मागील आठवडय़ात लिंबाच्या ६ ते ७ गाडय़ा म्हणजेच ६०० क्विंटलहून अधिक आवक होत होती. शुक्रवारी बाजारात ३ ते ४ गाडय़ा यातून अवघे १५० क्विंटल आवक झाली आहे.
अवकाळी पावसाचा फटका
या वर्षी अवकाळी पावसाने लिंबूच्या बागांना अपेक्षित पालवी फुटली नाही. परिणामी उत्पादन मोठय़ा प्रमाणत घटले आहे. त्यातच उन्हाच्या तडाख्यामुळे लिंबांना मोठय़ा प्रमाणावर मागणी वाढली असल्याने दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
‘एपीएमसी’च्या भाजी बाजारात लिंबाचे दर गेली महिनाभर सातत्याने वाढत आहेत. घाऊक बाजारात प्रति नग लिंबू दहा रुपयांपर्यंत मिळत आहे. करकोळ बाजारत ते आणखी महाग विकले जात असल्याने आता ग्राहकच लिंबू मागण्यास कचरत आहेत. त्यामुळे आंम्हीही लिंबू खरेदी करीत नाही.
-रवी शर्मा, किरकोळ विक्रेता, कोपरखरणे
