पनवेल : माथेरानच्या डोंगररांगांमध्ये संचार करत असलेल्या एक बिबट्या आणि त्याचा बछड्याचा वावर सध्या पनवेलच्या ग्रामीण भागात सुरू आहे. नितळस गावच्या गावक-यांनी बिबट्यासह बछड्याला स्वता पाहून त्याचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर टाकल्यावर वन विभागाने या परिसरात गस्त सुरू केली.
सोमवारपासून बुधवारपर्यंत अशा लागोपाठ तीन दिवसांमध्ये बिबट्या आणि त्याचा लहान बछडा नितळस वासियांना दिसल्याने गावात वन विभागाची गस्त घालणारे वाहन वन विभागाचे कर्मचारी गावात पोहचले. गुरुवारी रात्रींपासून गावातील तरूण मंडळींनी सुद्धा वन विभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीसाठी जमले होते. हातामध्ये टॉर्च आणि काठी घेऊन बिबट्याचा वावर होत असलेल्या मार्गावर ग्रामस्थ तैनात होते. गुरुवारी काही बिबट्या दिसला नाही. मात्र बिबट्यामुळे गावातील भटके कुत्रे कमी झाल्याचा दावा ग्रामस्थांच्यावतीने सुरू आहे.
या घटनेनंतर भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी गावक-यांच्या सूरक्षेसाठी पनवेलच्या तहसिलदार मिनल भामरे यांना निवेदन देऊन याबाबत वन विभागाच्या कर्मचा-यांची गस्त वाढविणे आणि सूरक्षेच्या उपाययोजना करण्याचे सूचना केली आहे. या निवेदनानंतर बिबट्यामुळे ग्रामस्थांच्या जिवाला धोका होऊ नये यासाठी वन विभागाने गस्त सुरू केली.
पनवेल – माथेरानच्या डोंगररांगांमध्ये संचार करत असलेल्या एक बिबट्या आणि त्याचा बछड्याचा वावर सध्या पनवेलच्या ग्रामीण भागात सुरू आहे. नितळस गावच्या गावक-यांनी बिबट्यासह बछड्याला स्वता पाहून त्याचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर टाकल्यावर वन विभागाने या परिसरात गस्त सुरू केली.… pic.twitter.com/QCGaB2sHV7
— LoksattaLive (@LoksattaLive) November 14, 2025
नितळस गावातील ३५ वर्षीय निलेश म्हात्रे यांनी बुधवारी रात्री साडेदहा वाजता बिबट्या आणि बछड्याला पाहीले. म्हात्रे यांचा शेती व्यवसाय आहे. नितळस गावाच्या पूर्वेला नितळे गाव ते वावंजा रस्त्याकडेला निलेश यांची शेती असल्याने रात्री शेतीचे काम संपवून निलेश त्यांच्या इकोव्हॅनने चोरंब्याची डोंगरी (भोईरांची डोंगरी) येथून घरी परतत असताना त्यांना बिबट्या व त्याचा बछडा दिसला. निलेश यांनी तातडीने मोबाईल फोनमध्ये बिबट्याचा व्हीडीओ काढला. तोपर्यंत बिबट्या गवतात लपला आणि काही क्षणात बछडा बिबट्या गवतात निघून गेला.
निलेश यांच्यासह अनेक शेतक-यांचा शेतीभाग जंगलाजवळ असल्याने या गावक-यांना बिबट्याचा दर्शन अधून मधून होत असल्याचे त्यांनी सांगतात. निलेश यांनी या बिबट्यांची माहिती त्यांच्या ओळखीच्या वन विभागातील कर्मचा-यांना दिली. याच गावातील कुणाल काटे यांना सुद्धा त्याच दिवशी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती निलेश यांनी दिली. जंगलाच्या शेजारी घरे असणा-यांची कोंबड्या व कुत्र्यांची शिकार बिबट्यांमुळे झाल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.
पनवेल तालुक्यातील माथेरान डोंगररांगांच्या भागातील वांगणी तर्फे तळोजा येथे मुंबई बडोदा महामार्गासाठी डोंगराच्या खाली दोन जुळे भुयारी बोगदा मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून या परिसरातील डोंगरांत स्फोट घडवून हा मार्ग केल्याने येथील प्राण्यांच्या मुक्त वावरावर निर्बंध आले आहेत.
यापूर्वी खारघर टेकडी, मोरबे गाव, वांगणी तर्फे तळोजे, शिरवली, अंबे तर्फे तळोजे, भेकरवाडी या गावांमध्ये बिबट्याचा वावर होता. मात्र बिबट्याने माणसावर हल्ला केल्याच्या घटनेची नोंद नाही. वन विभागाने रात्रीच्यावेळी गस्त वाढविणे, नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे, बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरे लावणे तसेच ड्रोन कॅमेराने त्यावर लक्ष ठेवण्याच्या खबरदारी घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
