नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण आतापर्यंत ७२.६५ टक्के भरले आहे. उपलब्ध पाणीसाठा नवी मुंबईकरांची तहान ७ एप्रिलपर्यंत पुरेल इतकाच असून धरण भरण्यासाठी १८०० मिमी पावसाची आवश्यकता आहे. पुढील काळात पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस न झाल्यास शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे.

नवी मुंबईत पावसाने जूनमध्ये आगमन केल्यापासून ओढ दिली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाणी कपातीचे नियोजन केले होते. विभागानुसार आठवड्यातून एक तास पाणी कपातीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र जुलै महिन्यातील पावसाने मोठा दिलासा मिळाला होता. मात्र या पावसानेही धरण अद्याप ७२.६५ टक्केच भरले आहे. धरणात ७ एप्रिल २०२३ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. परंतु धरण १०० टक्के धरण भरण्यासाठी अद्यापही १८०० मिमी पावसाची आवश्यकता आहे.

धरण गेल्या वर्षी दमदार पावसाने २९ सप्टेंबर २०२१ भरून वाहत होते. यंदा पावसाचे प्रमाण अनिश्चित असून अजूनही १८०० मिमी. पाऊस झाल्यास धरण पूर्ण भरणार आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरेल असा विश्वास मोरबे प्रकल्प कार्यकारी अभियंता वसंत पडघन यांनी व्यक्त केला आहे.

पाऊस

गेल्यावर्षी : २७६१.४ मिमी.
आता : २२६४.८ मिमी.

पाणीपातळी
२०२१-२२ – ८४.९९ मीटर

२०२२-२३ -८२.३० मीटर