वाशी रुग्णालयात उद्वाहक बंद असल्याने रुग्णांचे हाल

नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयांच्या स्थितीवर वारंवार टीका होत असूनही आणि महासभेपासून राजकीय व्यासपीठांपर्यंत सर्व स्तरांवर आरोग्य सेवेचे वाभाडे निघत असतानाही या सेवेत तिळमात्र सुधारणा झालेली नाही. वाशी येथील महापालिका रुग्णालयातील गेले पाच दिवस बंद असलेले उद्वाहक हे याचे ताजे उदाहरण आहे. रुग्णालयाची इमारत पाच मजली आहे.

शहरातील महापालिका रुग्णालयांत वाशी रुग्णालय हे तुलनेने बरी सेवा देणारे रुग्णालय मानले जाते. त्यामुळे तिथे रुग्णांचा राबता मोठय़ा प्रमाणात असतो. या रुग्णालयातील सामान्य रुग्णांसाठी असलेले उद्वाहक पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना आणि गर्भवतींना जिने चढत जावे लागते. या रुग्णालयात अपघातग्रस्त, गर्भवती, दंतरुग्ण, नेत्ररुग्ण आणि अन्यही अनेक आजारांनी ग्रासलेले हजारो रुग्ण रोज उपचारांसाठी येतात. या पाच मजली रुग्णालयातील सामान्य रुग्णांसाठी असणारे उद्वाहक बंद पडले आहे. त्यामुळे रुग्ण आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिन्यावरूनच ये-जा करावी लागते. सात दिवस उलटूनही त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्रस्त आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही पाच मजले चढून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागते.त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

उद्वाहकांची दुरुस्ती ही विद्युत विभागाची जबाबदारी आहे, असे सांगण्यात आले. विद्युत विभागाला माहिती देऊन उद्वाहक सुरू करण्यात येईल.

डॉ. रमेश निकम, अधिकारी, आरोग्य विभाग

ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतेही आजार निदान, तपासणी कक्ष तळमजल्यावर नाहीत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना गर्भवतींना तपासणीसाठी बरीच चढउतार करावी लागते. महापालिकेने या मध्यवर्ती रुग्णालयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

बाळकृष्ण कर्डिले, रुग्णाचे नातवाईक