उरण : जेएनपीएने खासगीकरण करून ३० वर्षांसाठी चालविण्यासाठी दिलेल्या न्हावा-शेवा कंटेनर टर्मिनलमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना व स्थानिकांना डावलून परस्पर परप्रांतीय कामगारांची सुरू असलेल्या कामगारभरतीमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. बंदरातील कंपनीने चालवलेली थेट कामगारभरतीची प्रक्रिया तत्काळ बंद न केल्यास जेएनपीएच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा जेएनपीटी वर्कर्स युनियनने दिला आहे.  

जेएनपीएने आपल्या मालकीचे असलेले एकमेव कंटेनर टर्मिनल खासगीकरणातून मे. जे. एम. बक्षी कंपनीला ३० वर्षांसाठी दिले आहे. या कंपनीने कंटेनर टर्मिनलचा ताबा घेताच बंदराचे न्हावा-शेवा फ्री पोर्ट कंटेनर टर्मिनल असे नामकरण केले आहे. जेएनपीएने आपले उरलेले एकमेव कंटेनर टर्मिनल पीपीपी तत्त्वावर चालविण्यास दिले आहे. त्यामुळे जेएनपीएकडे स्वत:च्या मालकीचे आता कुठलेही कंटेनर टर्मिनल उरलेले नाही. त्यामुळे ज्या प्रकल्पग्रस्तांनी जेएनपीए बंदरासाठी शेतजमीन, समुद्रकिनारा दिला आहे अशा स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीची संधी थेट जेएनपीएमध्ये मिळणे जवळपास बंदच झाली आहे.

जे. एम. बक्षी कंपनीला जेएनपीएने पीपीपी तत्त्वावर आपले उरलेले एकमेव कंटेनर टर्मिनल चालविण्यास दिले आहे. त्यांनी न्हावा-शेवा फ्री पोर्ट कंटेनर टर्मिनलमध्ये प्रकल्पग्रस्तांना डावलून परस्पर परप्रांतीय कामगारांची खुलेआम भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही एक प्रकारे प्रकल्पग्रस्तांची घोर फसवणूक आहे. जेएनपीएने याआधीही खासगीकरण करताना विविध कंपन्यांशी केलेल्या करारामध्ये कामगार भरती स्थानिक प्रकल्पग्रस्तांमधूनच करावी अशी तरतूद केली होती. या कंटेनर टर्मिनलच्या खासगीकरण प्रक्रियेतही जुन्या कराराप्रमाणे तरतूद आहे. मात्र तरीही स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून न्हावा-शेवा फ्री पोर्ट कंटेनर टर्मिनलमध्ये परस्पर परप्रांतीय कामगारांची भरती सुरू केली आहे. भरतीमध्ये डावलण्यात येत असल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. या गंभीर प्रकरणाकडे  जातीने लक्ष घालून मे. जे. एम. बक्षी कंपनीला त्यांनी चालवलेली थेट कामगार भरती प्रक्रिया ताबडतोब बंद करून कामगारभरती फक्त जेएनपीए प्रकल्पग्रस्तांमधूनच करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा जेएनपीएविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जेएनपीटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस, माजी कामगार विश्वस्त रवींद्र पाटील यांनी जेएनपीए अध्यक्ष संजय सेठी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.