नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना वाशी सेक्टर २६ मधील परिवहन डेपोच्या जागेवर तयार होणाऱ्या ट्रक टर्मिनल प्रस्तावाला २०२१ मध्ये स्थगिती दिली होती. मात्र सिडको मार्फत सदर ट्रक टर्मिनल पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून या ट्रक टर्मिनलला येथील स्थानिकांचा आधीपासूनच विरोध आहे. त्यामुळे सदर ट्रक टर्मिनल रद्द करावा अशी मागणी माजी नगरसेवक विलास भोईर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या कडे केली आहे.

सिडकोच्या वतीने वाशी सेक्टर २६ पुनीत कॉर्नर समोर राज्य परिवहनसाठी १५ हजार स्क्वेअर मीटरचा भुखंड आरक्षित ठेवला होता. मात्र सदर भूखंडावर ट्रक टर्मिनल उभारण्याचा घाट सिडकोने घातला आहे. मात्र तायार होणारा ट्रक टर्मिनल हा लोकवस्तीत असून दोन्ही बाजूला शाळा कॉलेज आहेत. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांसह नागरीकांची मोठी वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी जर ट्रक टर्मिनल सुरू केला तर वाहतूक कोंडी सह अपघाताची शक्यता देखील अधिक आहे. त्यामुळे या ट्रक टर्मिनलला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. ही बाब माजी नगरसेवक विलास भोईर यांनी खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर ट्रक टर्मिनल रद्द करावा म्हणून विलास भोईर यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी केली . या कामाला २०२१ मध्ये तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र सदर स्थगिती कालावधी संपताच ट्रक टर्मिनलच्या कंत्राट दराने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा…भुयारी मार्ग तरीही सुरक्षा धोक्यात, जीव धोक्यात घालून पामबीच मार्ग ओलांडण्याचे प्रकार सुरूच

त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांचा ट्रक टर्मिनलला असलेला विरोध पाहता सदर ट्रक टर्मिनल रद्द करावा अशी मागणी माजी नगरसेवक विलास भोईर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या कडे केली आहे.

हेही वाचा…विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे काम रखडणार? भूसंपादन मोबदलाच्या फाईल एमएसआरडीसीने परत मागवल्या

सिडकोच्या वतीने वाशी सेक्टर २६ पुनीत कॉर्नर समोर उभारण्यात येणारा ट्रक टर्मिनल हा संपूर्णपणे लोकवस्तीत असून आजूबाजूला शाळा कॉलेज आहे. त्यामुळे भविष्यातील धोका पाहता या ट्रक टर्मिनलला आमचा विरोध आहे. तरी देखील या ठिकाणी सिडकोने ट्रक टर्मिनल सुरू करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तीव्र आंदोलन करू. विलास भोईर, माजी नगरसेवक