scorecardresearch

“राहिले ते निष्ठावान मावळे, उडाले ते कावळे” उरणच्या शिवगर्जना अभियानात सुभाष देसाईंचे मत, म्हणाले…

उरण विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवगर्जना अभियान व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

subhash desai
शिवसेना नेते सुभाष देसाई

उरण : आमचे नाव, चिन्ह घेतलत मात्र आमच्या जवळ मातोश्री आणि ठाकरे आहेत. तो पर्यंत कुठलीही ताकद आम्हाला नमवू शकत नाही, त्यामुळे राहीले ते निष्ठावान मावळे,उडाले कावळे असे मत शनिवारी उरणच्या जेएनपीटी येथील कामगार वसाहतीच्या बहुद्देशीय सभागृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात बोलतांना माजी मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.

उरण विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवगर्जना अभियान व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देसाई बोलत होते. त्यांनी देशात २०२४ च्या निवडणुकीत भाजपचा इजा,बिजा आणि पराभवाचा तिजा होणार असल्याचे सांगून आता त्यांनी अनेक राज्यात कोणी मित्र शिल्लक ठेवला नाही. सर्वजण सोडून गेले. महाराष्ट्रात ही नुकताच झालेल्या विधानसभा व परिषदेच्या आठ जागांपैकी केवळ दोन जागा भाजपाला मिळाल्या आहेत.

भाजपने गुजरातमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्राचे नुकसान केले. अनेक उद्योग राज्यातून नेले असल्याची टीका भाजपवर केली. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील यांनी पुढील जिल्हा परिषदेच्या निवडणूका शिवसेनाच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला,तर उरणचे माजी आमदार मनोहर भोईर यांनी रायगड मधील तिन्ही गद्दार आमदारांना जनता येत्या निवडणूकीत जागा दाखवील,उरण मधील शिवसैनिक निष्ठावान आहेत.  त्यामुळे विजयाची शिवगर्जना गावोगावी झाली पाहिजे. असे आवाहन केले. यावेळी जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील,उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर,युवा नेते दीपक भोईर,पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर आदीजण उपस्थित होते. या शिवगर्जना अभियाना अंतर्गत उरण शहरातून एक मोटार सायकल रॅली काढण्यात आलीं होती.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 23:24 IST