नवी मुंबई – ‘महाइंडेक्स-२०२३’ हे औद्योगिक प्रदर्शन सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे १ ते ३ जून २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या औद्योगिक प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे.
चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (COSIA) व महाराष्ट्रातील सुमारे ३५ औद्योगिक संघटना प्रथमच एका छताखाली नेटवर्कसाठी एकत्र येणार असल्याने हे महाराष्ट्रातील पहिले ‘मेगा इंडस्ट्रियल एक्स्पो’ ठरणार आहे.




‘महाइंडेक्स’मध्ये सुमारे १५० उद्योजक त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. त्यामुळे लघुउद्योगांकडे उपलब्ध असणारे आधुनिक तंत्रज्ञान बघण्याची संधी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या उद्योजकांना मिळेल.
ह्या एक्स्पोमध्ये अभियांत्रिकी आणि त्या संलग्न उद्योगांसाठी संभाव्य खरेदीदार आणि पुरवठादारांशी संपर्क साधण्यासाठी बी२बी मॅच मेकिंगच्या संधी उपलब्ध होतील. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्टमंडळासहित काही देशांचे दूत व वाणिज्य अधिकारी तसेच जर्मनी, इंडोनेशिया, फ्रान्स, कोरिया, मॉरिशस तसेच अनेक देशांचे प्रतिनिधी व कंपन्या भेट देणार आहेत.
हेही वाचा >>> पनवेल: वीज कापण्याच्या बहाण्याने पाऊणेसात लाखांची फसवणूक
‘महाइंडेक्स’मध्ये उद्योगांसाठी आयोजित ‘काॅन्क्लेव्ह’मध्ये शासनाच्या लघुउद्योगांसाठी विविध योजना, लिन मॅनुफॅक्चरिंग, फॅक्टरिंग, पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह, डीलेड पेमेंट इत्यादी विषयांबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल.
सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपन्यांकडून थेट कामे मिळावीत याकरिता महाप्रदर्शनीत कोंकण रेल्वे, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, माझगाव डॉक, अटल इन्क्युबेशन सेंटर, थरमॅक्स ह्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘महाइंडेक्स’मध्ये लार्सन ॲण्ड टूब्रो, रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी अशा दिग्गज कंपन्यांची आत्मनिर्भर भारतअंतर्गत उत्पादित प्रोडक्ट्स बघण्याची संधी मिळणार आहे.
एमएसएमईसाठी एक वेगळे व्यासपीठ तयार करणे, सार्वजनिक उद्योग तसेच उद्योग क्षेत्रातील मोठ्या इंडस्ट्रियल प्लेयर्सना जोडणे, परस्पर सहकार्य करण्यास त्यांना सक्षम करणे व नवीन व्यवसायाच्या संधींचा शोध घेण्यास साहाय्य करणे असा ह्या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
हेही वाचा >>> वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
सदर ‘मेगा एक्स्पो’ हे एका वेगळ्या उपक्रमाचे केंद्र असेल, ज्यामध्ये व्यवसायाच्या नवीन संधी, नवीन सौदे केले जातील, नवीन उत्पादने लाँच केली जातील आणि सामाईक ज्ञानाचे आदानप्रदान केले जाईल व्यवसाय वाढीसाठी नवीन मार्ग मिळतील. हे औद्योगिक प्रदर्शन राज्याच्या रोजगारनिर्मितीत, आर्थिक वाढीव आणि उद्योग विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
ह्या प्रदर्शनात शासनाचा सहभाग असून महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाइंडेक्स’साठी पूर्ण पाठिंबा देण्याच्या सूचना संबंधित विभागास शासनातर्फे देण्यात आल्या आहेत . नवी मुंबई महापालिकेनेही ‘महाइंडेक्स’ला पाठिंबा दिला आहे. ‘महाइंडेक्स’मध्ये जास्तीत जास्त उद्योजकांनी भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.