पनवेल : कामोठे येथील सेक्टर ६ मधील दुधे कॉर्नर या इमारतीमध्ये रात्री आठ वाजण्याच्या सूमारास महानगर गॅसकंपनीचे मीटर बसविण्याचे काम सूरु असताना अचानक स्फोट झाल्याने एका कुटूंबातील सदस्यांसह महानगर कंपनीचे कामगार जखमी झाले. दुधे कॉर्नर या इमारतीमधील आकाश ओहाळ यांच्या घरात गॅसवाहिनीला मीटर बसविण्याचे काम सूरु असताना हा प्रकार घडला. या घटनेत महानगर गॅस कंपनीचे दोन कामगार आगीत होरपळले. तसेच ओहाळ यांच्या कुटूंबातील सदस्य किरकोळ जखमी झाले. तातडीने जखमींना उपचारासाठी वसाहतीमधील नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुधे कॉर्नर इमारतीच्या सी विंग सदनिका क्रमांक १२ मध्ये महानगर गॅसची नवी जोडणीचे काम सूरु असताना या सदनिकेत ओहाळ कुटूंबाचे पाच सदस्य आणि महानगर गॅस कंपनीचे दोन कामगार होते. गॅसवाहिनीचे जोडणी करताना मेनव्हॉल्व सूरु असल्याने गॅसचा पुरवठा सूरु होता. या दरम्यान वायुगळती अचानक झाली त्याचदरम्यान गॅस कंपनीच्या कामगारांनी शोल्डरींगचे काम सुरू केले यावेळी अचानक काही समजण्याच्या आत वायूगळतीमुळे आगीचा भडका उडून स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाची क्षमता एवढी तीव्र होती की दुधे कॉर्नरसह लगतच्या इमारतींमधील रहिवाशांची पळापळ झाली. रहिवाशी सैरावैरा पळू लागले. स्फोटामध्ये एक कामगार किरकोळ तर दुसरा जबर जखमी झाला. दूस-या कामगाराच्या छातीचा काही भाग होरपळला. आगीची खबर कामोठे पोलीस आणि सिडको महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाताच काही क्षणात तेथे सूरक्षा यंत्रणा पोहचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून वायुगळती होणा-या गॅसवाहिनीचा पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. कामोठे पोलिसांच्या पथकाने तातडीने जखमी कामगारांना कामोठे वसाहतीमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.