संपाच्या झळांची तीव्रता कमी; किरकोळ बाजारात ३०-४० रुपयांची घट

शेतकऱ्याचा संप सुरू असूनही नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाह शहरातील विविध बाजारांत सोमवारी भाज्यांची आवक सुरू होती. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वाढलेले भाज्यांचे दर ३० ते ४० रुपयांनी खाली उतरत संपकाळापूर्वीच्या दरांवर आले आहेत. पालेभाज्यांची आवक मर्यादित होती. फळांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.

शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी गेल्या आठवडय़ात आंदोलन सरू केले. सोमवारी नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भाज्यांची आवक सुरू झाल्यामुळे भाजी खरेदी करण्यासाठी किरकोळ व्यापांऱ्यानी बाजारात गर्दी केली होती. गेले तीन दिवस किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. मेथी १०० रुपयांवर पोहचली होती. तर कोथिंबिरीनेही शंभरी गाठली होती.

एपीएमसीत सोमवारी परराज्यांतून भाज्यांची आवक  झाली. किरकोळ बाजारात वांगी ३० ते ४० रुपये किलो, काकडी २० ते ३० रुपये किलो, कोबी ६० रुपये, आळूची पाने १५ रुपये जुडी, फ्लॉवर ४० रुपये किलो, शेवग्याच्या शेंगा २० रुपये जुडी, टॉमटो ६० रुपये या दराने विक्री सुरू आहे. दोन-तीन दिवसांत वाढलेला दर कमी झाल्याने किरकोळ व्यापारीदेखील सावरले असून नवी मुंबईतील बाजारात पालेभाज्यांची फारशी आवक झाली नाही.

घाऊक बाजारात ४५० ट्रक

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या शहरांना पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ांतून मोठय़ा प्रमाणावर भाजीपाल्याचा पुरवठा होतो. वाशीतील घाऊक बाजारातील भाजी पुरवठय़ाचे गणित शेतकरी संपानंतर पूर्णपणे बिघडले होते. शनिवारी पहाटे शेतकऱ्यांच्या एका गटाने संपमुक्तीस संमती दिल्यानंतर मात्र वाशी बाजारात भाज्यांची आवक वाढू लागली आहे.

ल्ल  रविवारी सुट्टीच्या दिवशी वाशी येथील घाऊक बाजारात तब्बल २५० वाहनांमधून भाज्यांची आवक झाली. सोमवारी राज्यभर शेतकरी संपाची हाक देण्यात आल्याने पुणे तसेच आसपासच्या परिसरांतील शेतकऱ्यांनी रविवारी रात्रीच वाशी येथील बाजारात भाजीपाला रवाना केला. त्यामुळे वाशी घाऊक बाजारात दुपापर्यंत ४५० वाहनांतून भाज्यांची आवक झाली होती.

दुग्धजन्य पदार्थ महागले

शेतकऱ्यांच्या संपामुळे दुधाचा पुरवठा कमी झाला आहे. दही, ताक, लस्सी व पनीरचे भाव वाढले आहेत. आणखी दोन दिवस संप सुरू राहिल्यास पुरवठा आणखी कमी होईल, या भीतीने डेअरीचालक धास्तावले आहेत. उन्हाच्या झळांमध्ये दिलासा देणारे दही, ताकासारखे पदार्थ महाग झाल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.

शेतकऱ्याचा संप सुरू आहे. हा संप सर्व राजकीय नेत्यांनी मिळून मिटवला पाहिजे. भाज्या महागल्याने गृहिणीचे बजेट कोलमडते. महागाईचा नाव पुढे करीत अनेक जण गैरफायदा घेतात.

– प्राजक्ता काळे, गृहिणी