सांधे बदलण्याचा प्रस्ताव चार वर्षांपासून बासनात

खोपटा पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आणि पुलावरील अवजड वाहतूक वाढल्यामुळे त्याला बसणाऱ्या हादऱ्यांत वाढ झाली आहे. या पुलाच्या उभारणीसाठी बेअरिंगचा वापर करण्यात आला आहे. सांधे (बेअरिंग) जुने झाल्यामुळे ते बदलण्यासाठी निधी देण्याचा प्रस्ताव चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला होता, मात्र अद्याप प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे.

खोपटा खाडीमुळे उरण तालुक्याचे पश्चिम व पूर्व भाग जोडले गेले आहेत. पुलाची बांधणी करताना दोन खांबांदरम्यान सांधे बसविण्यात आल्या आहेत. पुलावरील ताण कमी होऊन वाहतूक सुरळीत राहते. आता सांधे जुने झाले असून चार वर्षांपासून दुरुस्तीची मागणी होत आहे.

खोपटा पुलाच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्याचा पाठपुरावा केला जात आहे. या प्रस्तावाला दोन वर्षे झाली आहेत.

– अनिल करपे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

खोपटा पुलावरून जड वाहतूक होत असल्याने पुलाच्या हादऱ्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकी तसेच प्रवासी वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. सांधे त्वरित दुरुस्त करण्यात यावे.

– राजेंद्र ठाकूर, रहिवासी

खोपटा पुलावरून मी दररोज वाहन चालवितो. या पुलावरील हादऱ्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने वाहन चालवताना भीती वाटते.

– श्रीकांत हजारे, वाहनचालक