मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या डी.लिट. पदवीने सन्मान

प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षणासाठी येत असत. आजचे उच्च शिक्षण त्या विद्यापीठांच्या उंचीवर नेऊ शकतो का, याचा विचार करायला हवा, तसेच आदर्श राष्ट्रनिर्माण कार्यात उच्चशिक्षित तरुण डॉक्टरांचे योगदान मोलाचे असल्याचे मत राज्यपाल रमेश बैस यांनी आज नवी मुंबई  नेरुळ येथे येथे व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेरुळ येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षांत समारंभात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकमत ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती तथा अध्यक्ष डॉ. विजय पाटील, प्र कुलपती शिवानी पाटील, कुलगुरू वंदना मिश्रा चतुर्वेदी, आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा >>> नवी मुंबई : माजी विरोधीपक्ष नेत्या विरोधात मारहाण शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल

सामाजिक, वैद्यकीय सेवा व आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सेवेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच सामाजिक कार्यासाठी विजय दर्डा यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते मानद डॉक्टरेट (डी. लिट) देण्यात आली. या कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर,ठाणे पालिका आयुक्त बांगर यासंह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी  उपस्थित होती.. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विजय दर्डा यांना डी. लिट. पदवी मिळाल्याबद्दल राज्यपालांनी दोघांचे अभिनंदन केले.

राज्यपाल  बैस यांनी सांगीतले की  दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांसाठी खास दिवस असतो. पदवी घेताना तुमच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद दिसत आहे. आजपासून तुम्ही नव्या आयुष्यात पाऊल टाकाल आणि तुमचे भविष्य ठरवाल. तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही सुशिक्षित होऊन भविष्यातील जीवनाच्या वेगळ्या वाटेवर जाणार आहात. 

शिक्षणाच्या माध्यमातून प्रबुद्ध, सुसंस्कृत आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने २००३ मध्ये डी वाय पाटील विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. डॉ. पी. डी. पाटील आणि त्यांच्या समर्पित प्राध्यापकांच्या टीमने गेल्या वीस वर्षांत या संस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.  शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सतत प्रयत्नशील राहून,नॅकद्वारे ए प्लस प्लस मानांकन देऊन विद्यापीठाला उच्च शैक्षणिक जगतात सन्माननीय स्थान मिळविले आहे. पदवी मिळवलेल्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी सदैव तयार रहा असा संदेश दिला.

हेही वाचा >>> नवी मुंबई: महापालिका रुग्णालयात आर्थिक व्यवहारातून झालेल्या कर्मचारी भरतीच्या चौकशीची मागणी

विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर आपले मानाचे स्थान निर्माण केले आहे, ही आनंदाची बाब आहे. येथील विद्यार्थी जगातील कोणत्याही देशात जाऊन मानवाला निरोगी ठेवण्याचे काम करतील. आज बालरुग्ण आणि प्रौढ रूग्णांच्या पद्धतशीर थेरपीची नितांत गरज आहे, हे लक्षात घेऊन डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधील नवीन कॅथ लॅबमध्ये आधुनिक सुविधांसह वैद्यकीय – विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर काम करण्याची क्षमता निर्माण केली आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.

डी.लिट. पदवी राज्यातील सर्वसामान्य जनतेला व विद्यार्थ्यांना अर्पण -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डी लिट. पदवीने सन्मान झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेला डिलिट सन्मान मी राज्यातील जनतेला, गरीब, हुशार आणि संघर्ष करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्पण करतो.समाजाने, या राज्याने मला प्रेम दिले म्हणून मी आज हा सन्मान स्वीकारत आहे. कौटुंबिक जबाबदारीमुळे मला शिक्षण घेता आले नाही, परंतु नुकतेच मी माझे बीए शिक्षण पूर्ण केले आहे. यापुढील काळातही आणखी अनेक गोष्टी करायच्या आहेत. इतके वर्ष समाजात काम करताना मला जगाच्या विद्यापीठाने खूप काही शिकवले. सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे विनम्रता. विनम्रता हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये किती चढउतार आले आणि प्रत्येक माणसाने विनम्र असलं पाहिजे. श्रीमंतांच्या व मोठ्या माणसांच्या यादीत या एकनाथ शिंदेच नाव आल नाही तरी चालेल पण माणुसकीच्या यादीत नक्कीच माझ नाव घेतल जाईल अस काम सर्वसामान्यांसाठी करत राहीन  आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जिद्द, समर्पण भाव व कष्ट करण्याची तयारी हवी. हे असेल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल, असेही मुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra governor ramesh bais at 17th convocation ceremony of d y patil abhimat university zws
First published on: 28-03-2023 at 23:46 IST