नवी मुंबई : शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्राला धक्का बसेल अशी घटना नवी मुंबईत घडली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष आणि भांडार प्रमुख यांना लाच लुचपत विभागाने २o हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. विद्युत कामाच्या देखभाल दुरुस्तीचे देयक पारीत करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
राजेंद्र आहिरे आणि मनोहर पवार असे यातील संशयित आरोपीची नावे आहेत. राजेंद्र आहिरे हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष, (वर्ग-१) आहेत, तर मनोहर पवार हे शिक्षण मंडळाच्या भंडार शाखा प्रमुख आहेत.यातील तक्रारदार हे व्यवसायाने विदयुत ठेकेदार आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ कार्यालयीन विदयुत उपकरणे देखभाल व दुरूस्ती करण्याचे दिनांक १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राट देण्यात आले आहे.
त्यामध्ये दरमहा दुरूस्ती व देखभाल साठी .२६ हजार ४०० अधिक १८ टक्के वस्तू सेवा कर असे एकुण रक्कम ३१ हजार १५२ असे ठरले आहे. याबाबत रितसर कार्यदिश दिलेला आहे. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधी मधील दरमहा ३१ हजार १५२ रूपयाचे कर पावती (टॅक्स इन्व्हाईस) सह देयक मंजुरी करीता शिक्षण विभागीय मंडळ यांच्या कडे दिले होते.
मात्र हे देयक मंजूर करण्यासाठी कर वगळता असणारी रक्कम ३लाख १६ हजार ८० यावर सात टक्के प्रमाणे २२ हजार १७६ इतक्या लाचेच्या रकमेची मागणी मंडळ अध्यक्ष आहिरे यांनी भांडार प्रमुख पवार यांच्या मार्फत केली. तडजोड अंती २० हजार रुपयावर व्यवहार ठरला.
याबाबत तक्रारदार यांनी २५ मार्चला लाच लुचपत विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली.
तकारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ६ एप्रिलला करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी केली गेली. त्यात तथ्य आढळून आले.
७ तारखेला ( मंगळवारी ) दुपारी एकच्या सुमारास लाच लुचपत विभागाने लावलेल्या सापळा कारवाई दरम्यान राजेंद्र माणिक आहिरे, यांनी तक्रारदार यांचेकडुन २० हजार लाचेची रक्कम त्यांचे कॅबिन मध्ये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.सापळा पंचनामा कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. स दोन्ही संशयित आरोपू यांच्या विरोधात प्रशासन अधिनियम १९८८ प्रमाणे गन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु आहे.
