उरण : पावसाळी बंदीमुळे करंजा बंदरातील मासळी निर्यात बाजार ही बंद झाला आहे. या करंजा मच्छिमार बंदरातून २०२५ मध्ये ३० ते ३५ हजार मेट्रिक टन इतक्या मासळीची निर्यात झाली असून ही राज्यातील निर्यातीच्या १० टक्के निर्यात आहे. यावर्षी अनेक कारणांमुळे मासळीची आवक कमी असली तरीही निर्यातीत मात्र वाढ झाली असल्याची माहीती मासळी निर्यातदारांनी दिली आहे.

करंजा बंदर हे देशातील सर्वात मोठे मासळी निर्यातीचे हब बनू पहात आहे. यात अरबी समुद्रातून पकडलेल्या रिबन फिश,कटल, माकोल,नळ, कुपा, बांगडा आदी प्रकारच्या मासळीची निर्यात युरोप,थायलंड,व्हिएतनाम,हॉंगकॉंग,सिंगापूर, मिडल ईस्ट आधी भागात पोहचली आहे. नव्याने निर्माण झालेल्या करंजा मच्छीमार बंदरातून बंदरातून ६०० कोटींपेक्षा अधिकची निर्यात केली जात आहे. यावर्षी बंदरातून ३० ते ३५ मेट्रिक टन मासळीची निर्यात करण्यात आली असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली आहे.

ही मासळी अमेरिका,चीन थायलंड तसेच आशिया वन युरोप खंडातील अनेक देशात निर्यात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मासळी बंदर आणि त्यावर आधारित विविध प्रकल्पांमुळे करंजा परिसरात विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या लघु उद्योगात वाढ झाली आहे.त्यामुळे बंदरातील ४५० मासेमारी बोटी,त्यावर आधारित २ हजार कुटुंबाना लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे या बंदरामुळे येथील स्थानिक बेरोजगारांना बऱ्यापैकी रोजगारही उपलब्ध होऊ लागला आहे. मुंबईच्या ससून बंदराला पर्याय म्हणून उरणच्या करंजा येथे नवे मच्छिमार बंदर उभारण्यात आले आहे. त्यामुळे येथील मच्छिमारांना लाभ झाला आहे. त्याच बरोबरीने स्थानकांच्याही व्यवसायात भर पडली आहे.

प्रामुख्याने कोळी आगरी बांधवांचीच सर्वाधिक वस्ती आहे.यामुळे मासेमारी व्यवसाय करणे ओघाने आलेच.मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांमुळे राज्यातील सात सागरी जिल्ह्यातील सर्वात मोठे मच्छीमार करंजा गाव म्हणून ओळखले जाते.राज्यातील सर्वाधिक सुमारे ४५० मच्छीमार बोटी याच करंजा गावात मासेमारी करतात.राज्यातील सर्वात मोठी मच्छीमार सहकारी संस्थांही करंजातच आहे.वार्षिक सुमारे १०० कोटींची उलाढाल असलेल्या या मच्छीमार संस्थेच्या माध्यमातून डिझेल पुरवठा केला जात आहे.मच्छीमारांसाठी लागणारे साहित्य किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यासाठी दुकानही सुरू आहेत.

मच्छीमारांच्या शेकडो बोटी मासळी उतरविणे, विक्रीसाठी मुंबईतील एकमेव ससुनडॉक बंदराच्या आश्रयाला जात होते.त्यामुळे ससुनडॉक बंदरावरील वाढता ताण लक्षात घेऊनच करंजा येथेच उपयुक्त जागेत सुमारे ३०० कोटी खर्चाचे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे अद्यावत करंजा मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. याआधीच मच्छीमारांसाठी आवश्यक लागणारे साहित्य पुरविण्यासाठी जाळी,रंग,सामान पुरवठा करणारे हार्डवेअर,२०-२५ वर्कशॉप्स,जाळींची दुकाने आहेत.करंजा येथुन काही वर्कशॉप्समध्ये तयार करण्यात येणारे मच्छीमार बोटींसाठी लागणारे पंखे,टनट्युब, सॉफ्ट आदी यांत्रिक साहित्याला थेट विदेशातून मोठी मागणी आहे.असे यांत्रिक साहित्य विदेशात पाठवले जाते.

करंजा मच्छिमार बंदरावर २०२५ च्या मासळी हंगामात ३० ते ३५ मेट्रिक टन मासळी उतरविण्यात आली असून ही राज्यात उतरवण्यात आलेल्या एकूण मासळीच्या १० टक्के आहे. तर करंजा बंदरातून होणाऱ्या निर्यातीत ही वाढ झाली असल्याची माहिती करंजा येथील निर्यातदार गणेश नाखवा यांनी दिली आहे.

९० टक्के मासेमारी बोटी बंदरावर : १ जून पासून मासेमारी हंगाम दोन महिन्यांसाठी बंद होणार असून सद्या ९० टक्के मासेमारी बोटींनी करंजा बंदरात नांगर टाकला असल्याची माहीती करंजा संस्थेचे माजी उपाध्यक्ष रमेश नाखवा यांनी दिली आहे. मच्छिमारांना पापलेट आणि बांगडा माश्याचा आधार : यावर्षी ऑगस्ट ते मे या मासेमारी हंगामा दरम्यान आलेल्या अनेक संकटात ही पापलेट आणि बांगडा या माश्यांनी मच्छिमारांना आधार दिला.