नवी मुंबई: महावितरण मध्ये सध्या थकीत विद्युत देयक वसुलीची जोरदार मोहीम सुरु असून वीजबिल थकीत असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. म्हणून ग्राहक विविध माध्यमाचा वापर करून वीजबिलाचा भरणा करत आहेत. परंतु, काही ग्राहक स्वतःविरुद्ध कारवाई टाळण्यासाठी न वटणारे धनादेश देत असल्याचे अनेक उदाहरणावरून समोर आले आहे. ही महावितरणची दिशाभूल करत जाणूनबुजून वेळ वाया घालवत आहेत. महावितरण अशा ग्राहकांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. संजय पाटील यांनी ग्राहकांना दिला आहे.
अनेक वेळा महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहक धनादेशाद्वारे वीजबिल भरतात. कधी-कधी त्यांनी दिलेला धनादेश अनादरीत (चेक बाउन्स) होतो. कारण, अनेक वेळा ग्राहक दिलेल्या धनादेशावर चुकीची तारीख, चुकीची स्वाक्षरी, खाडाखोड, चुकीचे नाव टाकतात किंवा त्यांनी दिलेल्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याकारणाने धनादेश अनादरीत होतो. म्हणून, महावितरणने धनादेश अनादर झालेल्या वीज ग्राहकांवर कारवाई करण्याच्या निर्णय घेतला असून महावितरण भांडुप परिमंडल अंतर्गत वाशी मंडळातील ४ ग्राहकांची पोलिसात ऑनलाईन तक्रार नोंदविण्यात आली आहे. तर, ठाणे मंडळाच्या ३ ग्राहकांवर ऑनलाईन तक्रार नोंदविण्यात आली आहे.
यासोबतच चेक बाउन्स झाल्यास वीज ग्राहकांना प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५/- रुपयांचा दंड संबंधित ग्राहकांच्या पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येते, तसेच अनादरीत झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी स्वतंत्र दंडात्मक रक्कम लावण्यात येते, यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय प्रतिबंधित करण्याची कारवाई करण्यात येते.
महावितरण भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी ग्राहकांना आवाहन करताना म्हणाले की, “आपण वापरलेले विजेचे पैसे देण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्याला कोणत्या ही प्रकारच्या कारवाई सामोरे जावे लागू नये, म्हणून आपण प्रामाणिकपणे वीज बिलाचा भरणा करावा. तसेच महावितरणच्या विविध डिजिटल पेमेंट सुविधांचा वापर करून ग्राहकांनी देयक अदा केल्यास त्यांना विशिष्ट रक्कम सुट प्राप्त होते त्यामुळे सर्व ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा.
