नवी मुंबई : कधी कधी पोलीस ठाण्याचा परिसर केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित न राहता आशा, धैर्य आणि माणुसकीचं दर्शन घडवतो. सोमवारी, प्रजासत्ताक दिनी वाशी पोलिस ठाण्यात असाच एक क्षण अनुभवायला मिळाला. गंभीर अशा हृदयविकारासारख्या आजाराशी झुंज देणाऱ्या सात वर्षीय अंश सुधीर इंगळे या चिमुकल्यासाठी हा दिवस वेगळा आणि विशेष ठरला. पोलिसांचा गणवेश परिधान करून अधिकाऱ्यांच्या सान्निध्यात उभा असलेला अंश त्या दिवशी केवळ पाहुणा नव्हता, तर एका दिवसासाठी का होईना, वाशी पोलिस दलाचा भाग बनला होता.
‘मेक-अ-विश फाउंडेशन’च्या पुढाकारातून आणि वाशी पोलिसांच्या सहकार्याने अंशचे पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यात आले. पोलिसांच्या गणवेशात अंश वाशी पोलिस ठाण्यात दाखल होताच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि आपुलकीने त्याचे स्वागत केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी स्वतः अंशचे स्वागत करत त्याला सन्मानाने आपल्या खुर्चीवर बसवले. हा क्षण पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
यानंतर अंशला पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामकाजाची माहिती देण्यात आली. नागरिकांच्या तक्रारी कशा नोंदवल्या जातात, पोलिस जनतेच्या सुरक्षिततेसाठी कसे कार्य करतात, याची प्रत्यक्ष ओळख त्याला करून देण्यात आली. शिस्तबद्ध वातावरण, जबाबदारीची जाणीव आणि सेवाभाव अनुभवताना अंशच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद स्पष्टपणे जाणवत होता.
यावेळी बोलताना वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर म्हणाले, “अंशचे धैर्य आणि सकारात्मकता आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. इतक्या लहान वयात गंभीर आजाराशी सामना करत असतानाही त्याने पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरवता आलं, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. पोलिसांचा गणवेश म्हणजे अधिकाराचे नव्हे, तर समाजसेवेचे प्रतीक आहे.”
पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंशशी संवाद साधत त्याचे कौतुक केले आणि भविष्यात तो नक्कीच खरा पोलिस अधिकारी होईल, असा विश्वास व्यक्त केला. गंभीर आजाराच्या मर्यादा विसरून आशा, धैर्य आणि स्वप्नांची ताकद अधोरेखित करणारा हा उपक्रम ‘मेक-अ-विश फाउंडेशन’च्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारा ठरला. वाशी पोलिसांच्या या संवेदनशील पुढाकारामुळे अंशसाठीच नव्हे, तर उपस्थित प्रत्येकासाठी हा दिवस कायम स्मरणात राहणारा ठरला.

