सुटीच्या दिवसांत ग्राहकांचा ओघ वाढण्याची आशा
नवी मुंबई : शुक्रवारपासून नवी मुंबई निर्बंधमुक्त झाल्यामुळे व्यापारीवर्ग, दुकानदार आशावादी आहेत. मागील २ वर्षांपासून करोनाच्या संकटामुळे मेटाकुटीला आलेले व्यापारी वर्ग, दुकानदार, मॉल, शहरातील हॉल या सर्वानाच मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्वजण आशावादी असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने दिलेल्या निकषांमध्ये नवी मुंबई महापालिका चारही निकषांमध्ये बसत असल्याने नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहर १०० टक्के निर्बंधमुक्त झाले आहे. त्यामुळे मागील २ वर्षांपासून निर्बंधांच्या चौकटीत राहणाऱ्या नागरिक व सर्व आस्थापनांची सुटका झाली आहे. नवी मुंबई शहरात मोठय़ा प्रमाणात मॉल संस्कृती प्रचलित आहे.
शहरात वाशी, सीवूड्स विभागात मोठे मॉल असून हजारो लोक एकावेळी या ठिकाणी खरेदीसाठी येतात, परंतु करोनाच्या सुरुवातीच्या काळात संपूर्णत: टाळेबंदी त्यानंतर कधी ५० टक्के क्षमतेने दुकाने सुरू तर पुन्हा टोळेबंदी असे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे शहरातील व्यापारी व मॉलमधील व्यवसायही धोक्यात आले होते. शहरातील मॉलमधील अनेक दुकाने व्यापाऱ्यांनी करोनाच्या स्थितीमुळे व्यापाराच्या अनिश्चिततेमुळे दुकाने बंद केली होती. गुरुवापर्यंत दुकाने व शहरातील मॉल व विविध व्यापारी आस्थापना ५० टक्के क्षमतेने सुरू होती. परंतु आता १०० टक्के क्षमतेने सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने नागरिक तसेच व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
एकीकडे नियमावलींची अनिश्चितता तसेच दुसरीकडे करोना नियमावली भंग केल्यामुळे वारंवार पालिकेकडून होणारी दंडात्मक कारवाई यामुळे व्यापाऱ्यांमध्येही असंतोषाची स्थिती होती. परंतु आता नवी मुंबईत पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने या आठवडय़ातील शनिवारी व रविवारी मॉल व इतर ठिकाणीही चांगला प्रतिसाद मिळेल अशी व्यापारीवर्गाला आशा आहे. तर दुसरीकडे बेलापूर ते ऐरोलीपर्यंत शहरातील दुकानदारांमध्येही पुन्हा एकदा आपला व्यवसाय स्थिर करण्याची संधी मिळणार असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
नवी मुंबईत निर्बंधमुक्तीच्या निर्णयाचे स्वागतच आहे. करोनामुळे मॉल व मॉलमधील व्यावसायिकांना मोठय़ा आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागले होते. परंतु आता पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने दुकाने सुरु होत असल्याने व्यवसाय सुरळीत होण्याची आशा आहे. करोनामध्ये ४०० दुकानांवरून कमी होऊन फक्त १२५ दुकाने सुरू होती. आता पुन्हा दिवसभरात हजारो नागरिक मॉलमध्ये येत आहेत
– संदीप देशमुख, जनसंपर्क अधिकारी, रघुलीला मॉल, वाशी
नवी मुंबईत निर्बंधमुक्ती झाल्याने व्यापाऱ्यांना खूप हायसे वाटले असून पुन्हा एकदा आपला व्यवसाय उभा करण्यासाठी सर्वाचे प्रयत्न सुरू होणार आहेत. करोनाचा व त्याच्या नियमावलीचा व दंडात्मक कारवाईचा सर्वात मोठा फटका व्यापारीवर्गाला बसला होता. त्यामुळे आता निर्बंधमुक्तीमुळे दंडात्मक कारवाईची भीती राहणार नाही. – प्रमोद जोशी, व्यापारी महासंघ, नवी मुंबई