scorecardresearch

नवी मुंबई: तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अटकेत; पनवेलमधील धक्कादायक घटना

आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई: तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अटकेत; पनवेलमधील धक्कादायक घटना
पनवेल रेल्वे पोलिस स्टेशन फोटो- लोकसत्ता

पनवेल रेल्वे स्टेशन वर तीन वर्षीय मुलीस आडोशाला नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार होताच तत्काळ शोधाशोध केल्याने व मुलगी बेशुद्ध सापडल्यावर आरोपीचा शोध युद्ध पातळीवर घेतल्याने आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र या प्रकाराने रेल्वे स्थानकावर झोपणार्या बालिका वा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबले आणि सहा सात गाड्यांना उडवले ; एक जखमी

आज (गुरुवारी) सकाळी सातच्या सुमारास ३ वर्षीय मुलगी रात्री साडेतीन पासून बेपत्ता असल्याची माहिती तिच्या पालकांनी रेल्वे पोलिसांना दिली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तत्काळ मुलीची शोधाशोध सुरु करण्यात आली. सदर मुलगी बेशुद्ध अवस्थेत १ क्रमांकाच्या फलाटावर एका बाजूला आढळून आली. तिला तत्काळ पनवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची अवस्था पाहता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान सीसीटीव्ही व तांत्रिक तपासही वेगाने सुरु करण्यात आला होता. या वेगवान तपासणे जुईनगर रेल्वे स्टेशन वर संशयित आढळून येताच त्याला ताब्यात घेत पोलिसी खाक्याने चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यात आरोपीला अटक करण्यात आले असून मुकेशकुमार बाबू खा असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार सदर मुलगी लघुशंकेसाठी उठली होती. त्याच वेळेस तिला गोड बोलून जवळ बोलावले होते. आरोपी हा रेल्वे स्थानक परिसरातच भंगार वस्तू बाटल्या आदी गोळा करून ते विकून उदरनिर्वाह करतो. पोलिसांनी तात्काळ केलेल्या हालचाली मुळे गुन्हा दाखल झाल्यावर केवळ पाच तासात आरोपी गजाआड झाला. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 20:54 IST