नवी मुंबई : क्रिप्टो करन्सी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मागील आठवड्यात स्वस्तात सोने आणि ५०० रुपयांच्या नव्या करकरीत नोटा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३३ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणात फिर्यादी यांना ठाणे बेलापूर मार्गावर बोलावून व्यवहाराची देव घेण होत असताना बनावट पोलिसांनी फिर्यादी यांना पकडून धाड टाकल्याचे सांगत त्यांच्या कडील ३३ लाख रुपये घेतले. तसेच पोलीस ठाण्यात या असे फर्मान सोडले.
मात्र प्रत्यक्षात ते बनावट पोलीस असल्याचे उघडकीस आले . अगदी असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. खारघर येथे राहणारे हर्ष गुप्ता हे बांधकाम व्यवसायाशी निगडित व्यक्ती आहेत. त्यांचा आणि कबीर नावाच्या व्यक्तीची ओळख झाली. कबीर यांनी त्यांना क्रिप्टो करन्सी देण्याचे आमिष दाखवले. यासाठी १२ नोव्हेंबरला दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी ठरल्या प्रमाणे मार्शल कंपनी जवळ तुर्भे येथे आले. त्या ठिकाणी कबीर याचा साथीदार विशाल व अन्य एका व्यक्तीची याची भेट झाली मात्र काही वेळातच एका कार मध्ये दोन पोलीस आले त्यांनी हातातील पुडक्याची तपासणी करावयाचे आहे. असे सांगून फिर्यादी यांच्या कंदील ३ लाख ५० हजार ठेवलेले पुडके घेतले आणि काही कळण्याच्या आत सर्व जण पळून गेले.
या प्रकरणी फिर्यादी हर्ष यांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन कबीर, विशाल आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत चारही व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या दोन्ही गुन्ह्यात संशयित आरोपींची गुन्हे करण्याची पद्धत समान आहे. फिर्यादी यांना कमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणी बोलवायचे आणि तिथे बनावट पोलीस येत धाड टाकल्याचा आभास निर्माण करून फिर्यादी कडील पैसे घेऊन पोबारा करायचा. अशा पद्धतीने दोन्ही गुन्हे तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने त्या परिसरात असे गुन्हे करणाऱ्यांची एखादी टोळी सक्रिय झाली कि काय या अनुशंघाने पोलीस तपास करीत आहेत. स्वस्तात सोने क्रिप्टो करन्सी, अमेरिकन डॉलर असे विविध आमिष दाखवूं केवळ फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशा व्यवहारा पासून नागरिकांनी लांब राहुल होणारी फसवणूक थांबवावी. दुर्दैवाने असे घडलेच तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.
