शहरबात : विकास महाडिक

मनाजोगते झाले नाही की त्या विरोधात उघड आगपाखड करण्याची मंदा म्हात्रे यांची गेली ३० वर्षे जुनी परंपरा आहे. ती आता भाजपनेही अनुभवली आहे. म्हात्रे यांची आता भाजपमध्येही घुसमट होत असेल तर त्यांनी स्वगृही राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जाण्याची तयारी चालवली आहे, असा राजकीय अर्थही त्यांच्या या जाहीर टीकेतून काढला जात आहे.

बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मागील आठवडय़ात वाशी येथील एका जाहीर कार्यक्रमात स्वपक्षाला घरचा आहेर दिला. भाजपमध्ये महिलांना योग्य सन्मान दिला जात नाही. त्यांना नेहमीच डावलले जाते. दोन वेळा जनतेमधून निवडून आल्यानंतरही संघर्ष करावा लागत आहे. अशा शब्दात त्यांनी भाजपच्या एकूण महिलाविषयक धोरणावर टीका केली. त्यांची ही टीका राज्यभर चर्चेत राहिली. म्हात्रे या काही भाजपच्या राज्यस्तरावरील नेत्या नाहीत की राज्य कार्यकारिणीतील मोठय़ा पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांच्या या टीकेला स्थानिक पातळीवरची किनार आहे. राज्य स्तरावरील नेत्यांनी त्यांना स्थानिक पातळीवर मानसन्मान मिळवून द्यावा, स्थानिक नेत्यांना वरिष्ठांनी जाब विचारावा आणि आगामी पालिका निवडणुकीत आपली तिकीटवाटपाच्या वेळी दखल घ्यावी यासाठी ताईंचा हा सर्व खटाटोप आहे.

ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांचे नवी मुंबईत हे ताई-दादांचे राजकारण गेली ३० वर्षे सुरू आहे. ही टीका करताना त्यांनी बेधडक २०१४ मध्ये आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत निवडून आल्याचा प्रचार केला गेल्याचे सत्य सांगून टाकले. पण २०१९ च्या निवडणुकीत आपण कामाच्या जोरावर निवडून आल्याचे ठणकावून सांगितले. हे सांगताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या करिष्माचा आपल्याला उपयोग झाला नसल्याची एका अर्थाने कबुली दिली. भाजप हा एक शिस्तीचा पक्ष मानला जातो. अशावेळी पक्षातील एक आमदार पक्षातील असंतोष, नाराजी जाहीरपणे मांडत असून सर्वोच्च नेतृत्वाचे कर्तृत्व नाकारत असल्याचे चित्र आहे. ताईंची ही सवय फार जुनी आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या म्हात्रे यांची राजकीय वाटचाल ही काँग्रेस पक्षातून झाली. त्या नवी मुंबई पालिकेच्या पहिल्या नगरसेविका राहिलेल्या आहेत. आपल्या विरोधात लिहिलेले, बोललेले, केलेली कृती सहन न झाल्यास त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याची शेकडो उदाहरणे आहेत. काँग्रेसमध्ये असल्यापासून पवार यांच्याशी कौटुंबिक संबध असल्याने म्हात्रे यांनी जून १९९९ मध्ये राष्ट्र्नवादीची वेगळी चूल थाटणारे पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

पवार यांनी मोठय़ा विश्वासाने त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदाचा भार टाकला आणि म्हात्रे यांनी तो सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीपासूनच आक्रमक असलेल्या म्हात्रे यांचे राष्ट्रवादीतील अन्य महिला सहकाऱ्यांशी खटके उडू लागले. पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे करणाऱ्या म्हात्रे यांच्या कार्याची पक्षाने दखल घेऊन त्यांना विधान परिषदेची जागा दिली. मात्र, आमदार झाल्यानंतरही म्हात्रे यांना स्थानिक पातळीवर डावलले जात होते. स्वत:च्या मुलाला स्थायी समितीचे सभापतीपद मिळवून देताना म्हात्रे यांच्या नाकीनऊ आले. त्यानंतर गणेश नाईक यांच्याबाबतचा त्यांचा राग उफाळून आला. यावरून सीबीडी येथे एका कार्यक्रमात त्यांनी नाईक यांना शिवीगाळ केली. हा संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला जात राहिला. अखेरीस मंदा म्हात्रे यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मोदीलाटेत त्या आमदार बनल्याने नवी मुंबईतील भाजपची सूत्रे बऱ्यापैकी त्यांच्या हाती आली. परंतु, दोन वर्षांपूर्वी नाईकांनी राष्ट्रवादीला पुत्रप्रेमापोटी रामराम ठोकून भाजपचे कमळ हाती घेतल्याने म्हात्रे यांची पुन्हा पंचाईत झाली. त्यावेळी ताईंनी नाईकांना पक्षात घेऊ नये यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पदाधिकाऱ्यांकडे वारंवार विनवणी केली. मात्र, तेव्हा पुन्हा उमेदवारीचे स्पष्ट आश्वासन देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. त्या निवडणुकीत गणेश नाईक यांनी दोन जागा मागितल्या असतानाही त्यांना एकच जागा देऊन मंदा म्हात्रेंना दिलेले आश्वासन भाजपने पूर्ण केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हात्रे यांची अनेक नागरी व खासगी कामे मुख्यमंत्री असताना मंजूर केलेली आहेत. त्यांचा प्रत्येक वेळी मानसन्मान ठेवलेला आहे. असे असताना पक्षात महिलांचा मानसन्मान ठेवला जात नाही अशी जाहीर टीका करण्यामागे म्हात्रे यांचा एका कार्यक्रमाला न बोलावण्याचा राग आहे. विशेष म्हणजे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित होते. पाटील यांच्या खासगी संस्थेचा हा कार्यक्रम होता, तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता. त्यामुळे या कार्यक्रमाला कोणाला बोलवावे, कोणाला नाही हा त्यांचा प्रश्न होता. पण या लसीकरण कार्यक्रमाला म्हात्रे यांना न बोलवल्याने त्यांनी आपली खदखद वाशी येथील एका खासगी कार्यक्रमात व्यक्त केली.

नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवून राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली आहे. तीन वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा डोळा बेलापूर विधानसभेवर आहे. त्यासाठी त्यांनी फडणवीस यांना आपला नेता मानले असून शरीरावर फडणवीस यांचे नाव कोरण्याइतपत स्वामिनिष्ठा दाखवली आहे. त्याची पेरणी त्यांनी आत्तापासून सुरू केली आहे. पाटील यांच्या या खेळीने म्हात्रे त्रस्त झाल्या आहेत. या मन:स्थितीतूनच त्यांनी भाजपात महिलांना सन्मान दिला जात नाही, अशी ओरड केली. मनाजोगते झाले नाही की त्या विरोधात थयथयाट करण्याची म्हात्रे यांची गेली ३० वर्षे जुनी परंपरा आहे. ती आता भाजपनेही अनुभवली आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या म्हात्रे यांची आता भाजपतही घुसमट होत असेल तर त्यांनी स्वगृही- राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जाण्याची तयारी चालवली आहे, असा राजकीय अर्थही त्यांच्या या जाहीर टीकेतून काढला जात आहे.