नवी मुंबई : नवी मुंबई परिसरात सुसज्ज रुग्णालय उभे राहण्यासाठी यापूर्वी सिडकोने वेळोवेळी भूखंड देण्याचे मान्य केले, परंतु मैदानासाठी रुग्णालयासाठी आरक्षित असलेले भूखंड ठरावीक बिल्डरांना मिळावे यासाठी डाव टाकले गेले. भाजप नगरसेवकांनाच माझ्याविरोधात उभे करत शहरात मल्टी स्पेशलिटी रुग्णालय आणि महाविद्यालय उभारण्याचा प्रकल्प रोखण्याचा प्रयत्न वनमंत्री गणेश नाईक करत आहेत.

मात्र मुख्यमंत्री माझ्या पाठीशी आहेत. ज्या नगरसेवकांना पुढे करून रुग्णालयाचा प्रकल्प रोखला जात आहे त्या नगरसेवकांची बेकायदा बांधकामे बाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा थेट इशारा भाजपाच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिला.बेलापूर सेक्टर-१२ मधील भूखंड क्रमांक ४ वर प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीवरून नवी मुंबईत वाद तीव्र झाला आहे.

त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प पूर्णत्वास नेणारच असा निर्धार म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला.नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या १४ गावांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित करत अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी रुग्णालय त्या भागात हलवण्याची मागणी केली होती. त्यांच्या भूमिकेला सत्ताधारी भाजपमधील काही सदस्यांनी पाठिंबा दिल्याने प्रकल्पावरील मतभेद उघड झाले.

यावर प्रतिक्रिया देताना आमदार म्हात्रे म्हणाल्या की तुम्ही १४ गावात रुग्णालय उभारण्यास सांगत असाल तर नवी मुंबईकरांनी १४ गावात जाऊन उपचार घ्यावेत का? सीबीडी परिसरात सुमारे १२ मैदाने असल्याचा दावा करत त्यांनी संबंधित ८ एकरचा भूखंडच का हवा असा सवालही विरोधकांना केला. रुग्णालयाला विरोध करणाऱ्या ‘फोर्टी प्लस’ ग्रुपच्या नावाखाली व्यावसायिक व्यवहार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रुग्णालयासाठी लागणारी किमान जागा द्यावी, अशी मागणी करत त्यांनी प्रकल्प विखंडित होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. रुग्णालय पूर्ण झाल्यावर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयुक्तांशी चर्चा करून स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.प्रस्तावावर सखोल विचार करण्यासाठी तो आरोग्य समितीकडे वर्ग करण्यात आला आहे.

मात्र, आरोग्य समितीच्या भूमिकेवर मंदा म्हात्रे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत रुग्णालय अद्याप झालेच नसताना आरोग्य समितीचा संबंधच येत नसल्याचे सांगितले.दरम्यान, गणेश नाईक समर्थकांकडून रात्री उशिरापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती.

काय म्हणाल्या मंदा म्हात्रे?

  • मैदानाची मोठी जागा पूर्वी खासगी बांधकामासाठी देताना विरोध झाला नाही, मात्र सर्वसामान्यांसाठी सुसज्ज सरकारी रुग्णालय उभारण्यास विरोध का
  • मी सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारी महिला आहे. कोविड काळातील परिस्थिती पाहून मी या रुग्णालयाचा प्रकल्प नवी मुंबईत आणला. या प्रकल्पाला विरोधासाठी विरोध करणे चुकीचे आहे. हे रुग्णालय होणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. त्यामुळे हे रुग्णालय होणारच.
  • महिला काम करते म्हणून तुमचे नाक कापले जाते का? सभागृहात भाषा वापरताना भान ठेवले पाहिजे. मला कमी लेखू नका; मी कोणाला घाबरत नाही. जखम करा, पण चिमटे काढू नका.

आमदार मंदा म्हात्रे, बेलापुर