उरण : तालुक्यातील माणकेश्वर समुद्रकिनारी २३ स्फोटकसदृष्य कांडय़ा येथील दक्ष नागरिकांना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मोरा सागरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करीत नवी मुंबई बॉम्बशोधक पथकाकडून त्यांची तपासणी करुन त्या निकामी करण्यात आल्या. त्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला.
या कांडय़ा निकामी केल्या असल्या तरी अशा घटना गंभीर असल्याने त्यांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान या कांडय़ा या जहाजांवर धोक्याची सूचना देण्यासाठी सिग्नल फायर फ्लेअर्स म्हणून वापरण्यात येत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उरणच्या पश्चिम किनारपट्टी असलेल्या माणकेश्वर समुद्रकिनारी या कांडय़ा तेथील काही ग्रामस्थांना आढळून आल्या. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. याच दरम्यान, दोन कांडयांचे स्फोट झाल्याने गावकऱ्यांना किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. समुद्रकिनारी शोध घेतला असता या परिसरातील खडक आणि किनारी परिसरात एकूण २३ कांडय़ा आढळून आल्या. त्यामुळे नवी मुंबई बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांन या कांडय़ा निकामी केल्या.
मोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत मोहिते आणि साहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी माणकेश्वर किनाऱ्याची पाहणी केली. उरणच्या समुद्रकिनारी आढळून आलेल्या स्फोटकसदृष्य कांडय़ा या जहाजांवर धोक्याची सूचना देण्यासाठी सिग्नल फायर फ्लेअर्स वापरण्यात येत असल्याची शक्यता वर्तवली. तसेच त्या निकामी केल्या असल्या तरी हाताळणे धोकादायक असल्याची माहिती मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत मोहिते यांनी दिली. तर नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाने आढळलेल्या या स्फोटकसदृष्य कांडय़ा निकामी केल्याची माहिती न्हावा शेवा बंदर विभागाचे सहायक आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली.