पनवेल : मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागात कार्यरत कक्ष अधिकारी विलास ज्ञानोबा लाड यांना ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर येथे रंगेहाथ पकडले. शासकीय निधी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ही लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे मंत्रालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लाड हे मंत्रालयात वर्ग-१ कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असून, तक्रारदाराच्या गावातील मूलभूत सुविधा विकास कामांसाठी २५/१५ व अल्पसंख्याक योजनेंतर्गत शासकीय निधी मंजूर करून देण्यासाठी त्यांनी ६,३७,००० रुपयांची लाच मागितली होती. संबंधित गावाच्या सरपंचांनी तक्रारदाराला अधिकारपत्र दिल्याने तो निधी मंजुरीसाठी मंत्रालयात वारंवार ये-जा करत होता.तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने ९ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्यानंतर १६ मार्च रोजी पडताळणी करण्यात आली असता लाड यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. यानुसार रविवारी (ता.५ एप्रिल) रोजी खारघर येथे सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान लाड यांना तक्रारदाराकडून ६,३७,००० रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या पथकाने, पर्यवेक्षक अधिकारी सागर आरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपीकाच्या लाच प्रकरणानंतर पुन्हा एकदा मंत्रालयातील अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याची चर्चा आहे. मागील वर्षीही सिडको डळातील लाचखोरीवर पोलिसांनी जोरदार कारवाई केली.
