नवी मुंबई : शहरातील एकमेव सांस्कृतिक व्यासपीठ असलेले वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहाच्या नूतनीकरणावर १३ कोटींपेक्षा अधिकचा खर्च करूनही या मध्यवर्ती नाटय़गृहात आजही अनेक उणिवा प्रकर्षांने जाणवत आहेत.
नऊ कोटी रुपयांची स्थापत्य कामे अजूनही शिल्लक असून उद्यान आणि इतर सुविधांवर थातुरमातुर दुरुस्ती केली आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बांधून तयार असलेले उद्वाहन काही दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. नाटय़गृहाच्या ध्वनिव्यवस्थेबाबत एका ज्येष्ठ नाटय़ कलाकराने नाराजीदेखील व्यक्त केल्याचे समजते.
शहरांचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोने नवी मुंबईसाठी १९९५ मध्ये वाशी येथे विष्णुदास भावे नाटय़गृह उभारलेले आहे. सिडकोने त्या वेळी या सांस्कृतिक व्यासपीठावर १६ कोटी रुपये खर्च केले होते. २५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या नाटय़गृहात मध्यंतरी नाटय़कर्मीच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे
येत होत्या. पावसाळय़ात एका वाद्यवृदांच्या कार्यक्रमावेळी या नाटय़गृहाच्या मुख्य व्यासपीठावर स्लॅब कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली होती. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेले हे नाटय़गृह निकृष्ट होऊ लागल्याचे दिसून येत होते. नाटय़गृहातील खूच्र्या दोन वेळा बदलूनही त्या जैसे थे होत्या. नाटय़गृहात डासांचा स्वैर संचार सुरू असल्याने प्रेक्षकांची नाराजी होती. ध्वनिव्यवस्थेबाबत तक्रारी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे या नाटय़गृहाचा कायापालट करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला. त्यासाठी १३ कोटी रुपयांची अंदाज खर्चाची निविदा काढण्यात आली होती. दोन ते तीन वेळा फेरनिविदा काढल्यानंतर हे काम एका कंत्राटदाराने पूर्ण केले आहे. त्यानंतरही या कामात अनेक
उणिवा राहिलेल्या आहेत. प्रवेशद्वाराजवळ एटीएम बसविण्याचे प्रस्तावित होते मात्र आजतागायत ते बसलेले नाही. नाटय़गृहातील उद्यान फार जुने झाले असून वृक्षसंपदेची म्हणावी तशी वाढ नाही. वाहनतळाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे काही अंर्तगत कामांची रंगरंगोटी आणि डागडुजी हे सोपस्कर पूर्ण झाले असले तरी तक्रारी कायम आहेत.
अद्ययावत नाटय़गृह कधी?
नाटय़गृहाच्या ध्वनिव्यवस्थेबाबत प्रेक्षकांसा नाटय़ कलावंत नाराजी व्यक्त करीत आहे. बाहेरच्या कामांना अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाटय़गृहाचा कायापालट झाला आहे असे दिसून येत नाही. या नाटय़गृहाच्या अद्ययावत उभारणीची नाटय़रसिक वाट पाहात आहेत.