माणसाची एखादी गरज ही रास्त असो किंवा नाही. गरज निर्माण झाली की ती पुरी करायला बाजारपेठ कायमच सज्ज असते. याचा दाखला ‘पेट इन्डस्ट्री’ सातत्याने देते. श्वानाचे टवकारलेले कान पाहायला आवडतात म्हणून त्याचे कान शिवणे, कान टोचून त्याच्यात रिंग अडकवणे अशा अनेक हौशी माणूस प्राण्यांच्या नैसर्गिक रचनेच्या स्वभावाच्या विरोधात जाऊन भागवत असतो. त्याला बाजारपेठेची साथ असते किंबहुना नवी नवी उत्पादने पुरवून या हौशीतूनच फायद्याची गणिते साधली जात असतात. श्वान हा घरातील सदस्य झाला आणि माणसाचे शिष्टाचार त्याच्यावरही नकळतपणे लादले जाऊ लागले. त्यातूनच श्वानाचे भुंकणे ही नैसर्गिक गोष्टदेखील माणसाला बेशिस्तपणाची वाटू लागली. अशा भुंकणाऱ्या श्वानाला शिस्तीत ठेवण्यासाठी अनेकविध उत्पादने बाजारात आली. कुत्र्याचे भुंकणे बंद करणारे पट्टे (बार्क कंट्रोल कॉलर्स किंवा नो बार्क कॉलर्स) हे असेच एक उत्पादन. म्हटले तर श्वानाच्या सततच्या भुंकण्याने वैतागलेल्या पालकांना दिलासा देणारे आणि त्याच वेळी श्वानाबरोबरच्या नैसर्गिक संवादाला मारणारे..

श्वानाचे काम काय? तर घराची, शेताची राखण करणे हा अगदी पहिली-दुसरीच्या परिसर अभ्यासात शिकलेला धडा असतो. घरी कुणी अनोळखी व्यक्ती आली आहे, काही तरी संशयास्पद हालचाली सुरू आहेत याची माहिती देण्यापासून स्वत:च्या वैयक्तिक गरजांची मागणी आपल्या पालकासमोर मांडण्यासाठी भुंकणे हा एकच पर्याय श्वानपुढे असतो. घरी आलेला पाहुणा हा पालकासाठी कितीही महत्त्वाचा असला, तरी श्वानासाठी तो अनोळखी असतो आणि त्याची सूचना पालकाला देणे किंवा वेळप्रसंगी परिसरात प्रवेश करण्यापासून पाहुण्याला रोखणे हे नैसर्गिक कर्तव्य श्वान भुंकण्यातूनच बजावत असतात. मात्र श्वानाचे असे भुंकणे काही वेळा पालकांच्या शिष्टाचाराच्या संकल्पनेत बसत नाही. अलीकडे सोसायटय़ांमधील वादाचे घटक ठरलेल्या पाळीव श्वानांबाबत भुंकण्याचा त्रास होतो किंवा भीती वाटते हीच तक्रार सर्वाधिक असते. श्वानाचे भुंकणे थांबवण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी सध्या ‘बार्क कंट्रोल डॉग कॉलर्स’ला पालकांकडून मागणी वाढत आहे.

हे पट्टे कसे काम करतात?

श्वानाच्या गळ्यात घालायचे, बाकीच्या सर्वसाधारण पट्टय़ांसारखे दिसणारे हे पट्टे असतात. मात्र श्वान भुंकले की त्याला या पट्टय़ातून खूप कमी तीव्रतेचा झटका बसतो. किंवा पट्टय़ात कंपने निर्माण होतात, किंवा मोठा आवाज होतो आणि श्वान घाबरते. यातील तिसरा प्रकार असतो तो स्रिटेनॉलचा स्प्रे चेहऱ्यावर उडतो आणि घाबरून श्वानाचे भुंकणे बंद होते. स्वयंचलित आणि रिमोटवरील असे दोन प्रकारचे पट्टे यात असतात. स्वयंचलित पट्टय़ांमध्ये श्वानाच्या भुंकण्याच्या आवाजाच्या तीव्रतेनुसार हा पट्टा काम करतो. आवाज लहान असेल तर मोठा आवाज, थोडीशी कंपने निर्माण होतात. तरीही भुंकणे थांबले नाही, तर मात्र श्वानाच्या मानेला विजेचा अगदी कमी तीव्रतेचा झटका बसतो. हा झटका जिवाला हानी पोहोचवणारा नसला तरी श्वानाला भीती दाखवणारा असतो. रिमोटवरील पट्टय़ांमध्येही अशाच प्रकारची यंत्रणा असते मात्र त्याचे नियंत्रण मालकाच्या हाती असते. अनेक परदेशी कंपन्यांबरोबरच भारतीय कंपन्यांकडूनही असे पट्टे तयार केले जातात. पशू उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये आणि संकेतस्थळांवर या पट्टय़ांची सर्रास विक्री होते. साधारण सहाशे रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत असे पट्टे मिळतात.

डॉग कॉलर्सची गरज असते का?

याबाबत श्वान प्रशिक्षक आणि बिहेविअर थेरपिस्ट विक्रम होशिंग यांनी सांगितले, ‘श्वान उगाचच कधीच भुंकत नाहीत. श्वान का भुंकतात याचे कारण शोधणे जास्त महत्त्वाचे असते. जेणेकरून श्वान उगाचच भुंकत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. मात्र बार्क कंट्रोल कॉलर्स वापरणे हा पर्याय असू शकत नाही. त्याने श्वानाला भीती बसून त्याचे भुंकणे बंद झाले तर त्याबरोबरच पालकाशी होणारा संवादच थांबतो. त्याचा परिणाम श्वानाच्या आरोग्यावरही होऊ शकतो. श्वानाला प्रशिक्षण देऊन सूचना ऐकण्याची सवय लावता येते.’

श्वान का भुंकते?

भुंकणे हेच श्वानाचे संवादाचे मुख्य माध्यम आहे. धोक्याची सूचना देण्याबरोबर, भीती वाटली, फिरायचे असेल, भूक लागली, पाणी हवे असेल, कंटाळा आला अशा अनेक कारणांनी श्वान भुंकत राहतात. पालकाचे होणारे दुर्लक्ष हेदेखील सतत भुंकण्यामागचे कारण असू शकते. श्वान त्याची गरज भुंकण्यातून मांडत असतात. श्वानाला पुरेसा वेळ दिला जात असेल तर पालकांना त्याच्या भुंकण्याची कारणे कळू शकतात. त्यानुसार उपाय करता येणे शक्य असते.