नवी मुंबई : दुष्काळी परिस्थितीत कांद्याला मिळत असलेल्या चांगल्या बाजारभावाला आता स्वस्त आयात कांद्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात बुधवारी इजिप्तमधून दोन कंटेनरमधून सुमारे ६० टन कांदा दाखल झाला. स्थानिक कांद्याला घाऊक बाजारात ४५ ते ५० रुपये किलोचा दर मिळत असताना इजिप्तच्या कांद्याची ३८ ते ४० रुपये किलोने विक्री होत आहे. आयात वाढल्यास स्थानिक कांद्याचे दर घसरण्याची शक्यता व्यक्त होत असून, शेतकरी संघटनांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
एपीएमसीत बुधवारी महाराष्ट्रातून सुमारे १९ हजार ९५० गोणी कांद्याची आवक झाली. स्थानिक कांद्याला प्रतवारीनुसार ४५ ते ५० रुपये किलोचा दर मिळत आहे. दुष्काळ, पाणीटंचाई आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा दर दिलासा देणारा आहे. मात्र, स्थानिक कांद्यापेक्षा कमी दरातील आयात कांदा बाजारात उपलब्ध झाल्याने पुढील काळात दर घसरण्याची चिंता व्यक्त होत आहे.
४०० कंटेनरची शक्यता
सध्या इजिप्तमधून दोन कंटेनरमधून ६० टन कांदा दाखल झाला असला तरी आगामी काळात सुमारे ४०० कंटेनर कांदा येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आयात मोठ्या प्रमाणात झाल्यास बाजारातील कांद्याचा पुरवठा वाढेल. कमी दरातील आयात कांद्याला मागणी वाढल्यास महाराष्ट्रातील कांद्याची मागणी कमी होऊन दर घसरण्याची शक्यता आहे. इजिप्तच्या कांद्याला मुंबई आणि उपनगरांतील हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आयात कांद्यापैकी सुमारे ८० टक्के कांदा या व्यावसायिकांकडून खरेदी केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शेट्टींचा आंदोलनाचा इशारा
इजिप्तच्या कांद्याच्या आयातीवरून शेतकरी संघटनांनी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आयात वाढल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने आयात शुल्क कमी केल्यानेच परदेशातून कांदा आयात होत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ असताना कांद्यामुळे शेतकऱ्याला चार पैसे मिळत असतील तर सरकारला हे पाहवत नाही का? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आणखी कंटेनर महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे कांद्याच्या आयातीचा मुद्दा आगामी काळात राजकीय संघर्षाचा विषय होण्याची शक्यता आहे.
“महाराष्ट्रातील कांदा ४५ ते ५० रुपये किलो, तर इजिप्तचा कांदा ३८ ते ४० रुपयांत मिळत आहे. आणखी ४०० कंटेनर येण्याची शक्यता आहे. आयात वाढल्यास महाराष्ट्रातील कांद्याचे दर कमी होऊ शकतात.” सुनील अडसूळ, कांदा व्यापारी, एपीएमसी
“इजिप्तचा कांदा स्वस्त दरात विकला जात असेल तर शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत कांद्याला चांगला दर मिळत असताना आयात वाढल्यास महाराष्ट्रातील कांद्याचे दर घसरतील.” जितेंद्र येवले, कांदा उत्पादक शेतकरी
“महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती असताना कांद्यामधून शेतकऱ्याला चार पैसे मिळत असतील तर सरकारला ते पाहवत नाही का? आणखी कंटेनर महाराष्ट्रात आल्याची माहिती मिळाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.” राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
