मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, वाशी

समाजातील त्रुटी, उणिवा, कमतरता लक्षात घेऊन ती कसूर भरून काढण्यासाठी असंख्य हात आपापल्या परीने झटत असतात. अशाच हातांची मोट बांधून सामाजिक संस्था उदयास येते. यातील काही संस्था एखाद्या वंचित घटकाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहतात तर काही समाजालाच नवीन दिशा देण्यासाठी धडपड करतात. अशाच संस्थांच्या कार्याचा आढावा घेणारे हे पाक्षिक सदर..

सिडकोने २१व्या शतकातील शहर म्हणून नवी मुंबईची निर्मिती केली. शहराचा विकास झपाटय़ाने होत असताना येथील टॉवर व मॉल संस्कृतीत वाशीतील मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ आपले वेगळेपण जपले आहे. गेली ३९ वर्षे हे मंडळ अविरतपणे साहित्य, संस्कृती व कलेची जोपासना करत आहे..

नवीने उभारी घेत असलेल्या नवी मुंबईत ८ फेब्रुवारी १९७९ला आठ तरुणांनी एकत्र येत मराठी अस्मिता जोपासण्याच्या ध्येयाने वाशी येथे मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ स्थापन केले. ३९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेच्या इमारतीत पु. ल. देशपांडे, सुनीता देशपांडे, बाळासाहेब ठाकरे, वि. आ. बुवा, विश्वास मेहंदळे, मृणाल गोरे, वसंत बापट, विं. दा. करंदीकर, मंगेश पाडगांवकर, डॉ. श्रीराम लागू, सुहासिनी मुळगावकर, मनोहर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह अनेक मान्यवरांचे कार्यक्रम झाले.

नवी मुंबई शहराचे सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठीचे बीज या संस्थेने रोवले. सुरुवातीला १२ रुपये वार्षिक वर्गणी घेऊन सभासद नोंदणी सुरू झाली आणि सहा महिन्यांत मराठी साहित्यावर, कलेवर प्रेम असणाऱ्या २०० नवी मुंबईकरांनी मंडळाचे सभासदत्व मिळवले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे तत्कालीन संचालक विश्वास मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलाच कार्यक्रम झाला तो वसंत व्याख्यानमालेचा. त्यात मेहेंदळे, सुहासिनी मुळगावकर, बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे व वि. आ. बुवा यांचे कथाकथन झाले. तेव्हापासून आजपर्यंत शहराची संस्कृती, साहित्य व कला जोपासण्याचे काम या संस्थेने आजवर सुरू ठेवले आहे.

मंडळाने १९८२ मध्ये सिडकोकडून वाशी सेक्टर ६ येथे १०८२ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड खरेदी केला. किंमत होती ६० हजार रुपये, परंतु मंडळाकडे होते फक्त २५ हजार रुपये. सभासदांनी एक-दोन हजार रुपये गोळा केले आणि भूखंड घेतला. नियमानुसार तीन वर्षांत इमारत बांधणे बंधनकारक होते. परंतु मेहेंदळे यांच्या प्रेरणेने भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या मॅचिंग ग्रांट धोरणानुसार सभासदांकडून बिनव्याजी रक्कम घेऊन खुला रंगमंच उभारण्यात आला. त्यासाठी सभासदांनी सव्वा लाख रुपये गोळा केले.

दोन वर्षे रंगमंचावर छप्परच नव्हते. त्यानंतर तिथे सिमेंटच्या पत्र्याचे छप्पर टाकण्यात आले. याच वास्तूचे ‘साहित्यमंदिर’ असे नामकरण करण्यात आले. त्याच नावाने संस्था आज नवी मुंबईकरांना परिचित आहे. शेजारीच दुसऱ्या खोलीमध्ये २ ऑक्टोबर १९८४ रोजी साहित्य मंदिर वाचनालय सुरू करण्यात आले. १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने साहित्य मंदिर वाचनालयास ‘क’ वर्ग दिला होता. आज याच प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालयास शासनाचा ‘अ’ दर्जा प्राप्त आहे. १९९६ मध्ये  मंडळाच्या हितचिंतकांकडून मिळालेल्या देणग्या व  सिद्धिविनायक ट्रस्टकडून मिळालेली आर्थिक मदत यातून साहित्य मंदिराच्या सभागृहाचे काम झाले.

२००९ मध्ये इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. वाचनालयासाठी एक हजार १५० चौरस फूट जागा राखून ठेवण्यात आली आहे. प्रा. अश्विनी बाचलकर यांनी १२ लाख रुपये देणगी दिली. त्यानंतर साहित्य मंदिर वाचनालयाचे नाव बदलून प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय, तर व्यासपीठाचे  नाव प्रा. अश्विनी बाचलकर रंगमंच असे करण्यात आले.  याच साहित्य मंदिराच्या सभागृहात कोकण विभागीय ग्रंथालयाचे अधिवेशन २०१० मध्ये भरवण्यात आले होते. वाचनालयात एकूण २३ हजार ९५१ पुस्तके आहेत. तर एकूण १११६ सभासद आहेत. वाचनालयात काही पुस्तके ई-बुक स्वरूपात आहेत. संस्थेचे मुखपत्र ‘साहित्य मंदिर मासिक’ आहे.

संस्थेने २००९ मध्ये डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे याचा सत्कार केला होता. त्यातून लोकबिरादरी प्रकल्पाला साडेचार लाख रुपयांची मदतही लोकवर्गणीतून केली होती. संस्थेचे सदस्य हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ प्रकल्पांना भेट देतात. सुस्थितीतील कपडे आदिवासींना दिले जातात. असे सुमारे ९०० गोण्या कपडे दान करण्यात आले आहेत. २०१४ मध्ये संस्थेने आनंदवनातील विकलांग कलाकारांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम केला. देगणीद्वारे १९ लाख रुपये आनंदवनातील इमारतींच्या नूतनीकरणासाठी देण्यात आले.

किरण शांताराम यांच्या ‘प्रभात चित्र मंडळा’च्या वतीने दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी सायंकाळी ६.३० ते ९ दरम्यान जुने चित्रपट मोफत दाखविण्यात येतात. इमारतीत सौर ऊर्जेचा वापर केला जातो. दर पाच वर्षांनी मंडळाची कार्यकारिणी बदलली जाते. २०१४ पासून २०१९ पर्यंत असलेल्या कार्यकारी मंडळामध्ये अध्यक्ष सुभाष सीताराम कुळकर्णी असून ज्या आठ तरुणांनी मंडळाची सुरुवात केली त्यात कुळकर्णी एक होते. सध्या या मंडळाचे एकूण सदस्य १९०० सदस्य आहेत. शहरात महापालिकेचे विष्णुदास भावे नाटय़गृह स्थापन झाल्यानंतरही साहित्य मंदिराची लोकप्रियता तुसभरही कमी झालेली नाही. सातत्याने कला, साहित्य, संस्कृतीसाठी वाहून घेतलेल्या या मंडळाने शहराच्या साहित्य संस्कृतीच्या जतनात सिंहाचा वाटा उचलला आहे.

‘स्वर्गातही धूळ आहेच!’

त्या वेळी संस्थेच्या वतीने नाटकांचे प्रयोग केले जात. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ‘बिघडले स्वर्गाचे दार’ या नाटकाचा प्रयोग या खुल्या रंगमंचावर झाला होता. तिथे लाद्या नसल्याने मातीने सारवलेल्या जमिनीवर ‘कोण म्हणतो स्वर्गात स्वच्छता आहे. स्वर्गातही धूळ आहेच!’ असा प्रासंगिक विनोद बेर्डे यांनी केल्याचे सभासदांना आजही आठवते.

२६ जुलैच्या नुकसानातूनही उभारी

वाचनालयामध्ये येणाऱ्यांच्या व संस्थेच्या सदस्यसंख्येचा आलेख चढता असतानाच २६ जुलै रोजी झालेल्या जलप्रलयामध्ये ३ हजार पुस्तके पाण्यात बुडाली. त्यातील दोन हजार ४८० पुस्तके बाद करण्यात आली. संस्थेच्या साहित्य मंदिर मासिकातून सभासदांना पुस्तके देण्याचे आवाहन करण्यात आले तेव्हा ५ हजारांपेक्षा जास्त पुस्तके देणगी रूपाने मिळाली होती.