नवी मुंबई : व्यसनी पती भावांच्या सांगण्याप्रमाणे त्रास देत असल्याचा आरोप करत कंटाळलेल्या महिलेने गाव पंचायतीत तक्रार केली, मात्र निकाल तिच्याविरोधात लागल्याने तिने आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. रबाळे पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पती आणि दिराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित रिमा जैस्वार यांनी व्यसनी पती आणि त्याच्या दोन भावांविरोधात छळवणूक, मारहाण प्रकरणी तक्रार केली आहे. रीमा यांचा विवाह १२ वर्षांपूर्वी प्रवीणकुमार यांच्याशी झाला असून, त्यांना दोन मुली आहेत. प्रवीणकुमार हे त्यांचे भाऊ संदीप आणि रंजित हे जे सांगतील तसा त्रास देतात. काही वर्षांपूर्वी दोन मुली आणि रिमा यांना विजेचे झटकेही प्रेमकुमार यांनी दिले. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी उपस्थित असूनही त्याच्या दोन्ही भावांनी अडवण्याचे सोडून ठार करण्याचा सल्ला दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : स्ट्रॉबेरी स्वस्त; अंजीर महागले
याप्रकरणी रिमाने त्यांच्या मूळगावी पंचायतीत तक्रारी केली, मात्र निर्णय त्यांच्या विरोधात गेला. त्यात प्रेमकुमार याने अनेक पतपेढीचे कर्ज काढले होते, त्याच्या तगाद्याला कंटाळून तो ऑक्टोबरमध्ये नवी मुंबई सोडून निघून गेला आणि सध्या त्याने पत्नी आणि दोन्ही मुलींना गावी येण्याचे फर्मान सोडले आहे. या जाचाला कंटाळून शेवटी रीमा यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.