Mathadi leader Narendra Patil, mathadi strike navi mumbai, माथाडी संप नवी मुंबई, माथाडी संप | Loksatta

…तर माथाडी विधानभवनावर धडकणार, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा इशारा

माथाडी कामगारांच्या शासन दरबारी विविध विभागात प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तमाम माथाडी आणि व्यापारी यांनी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला होता.

Mathadi leader Narendra Patil
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा सरकारला इशारा (image – loksatta team/graphics)

नवी मुंबई – येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत माथाडी कामगारांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास अधिवेशनाच्या तोंडावर विधानभवनावर धडकणार असल्याचा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. माथाडी कामगारांच्या शासन दरबारी विविध विभागात प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तमाम माथाडी आणि व्यापारी यांनी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला होता, त्यावेळी माथाडींना संबोधताना ते बोलत होते.

यावेळी नरेंद्र पाटील यांनी हिंदुत्ववादी सरकार अस्तित्वात आले असून खुद्द मुख्यमंत्री हे आमच्या माथाडी कामगारांच्या साताऱ्याचे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून माथाडींच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे असताना देखील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे वारंवार या मागण्यांबाबत पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आज सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी, तसेच व्यापारी यांनी सहभाग नोंदवून नाशिक, पुणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, कोल्हापूर, कडकडीत बंद ठेवला होता. माथाडी कामगार हा असा घटक आहे जो मेहनत करून त्यांच्या कामाचे मोल मागत आहे. माथाडी कामगार कायदा टिकवण्यासाठी संयुक्तपणे बैठक घ्यावी, अशी मागणी केली.

हेही वाचा – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्ती?

माथाडी बोर्डात माथाडीच्या मुलांना नोकऱ्या द्याव्यात. माथाडी कामगारांच्या समस्यांमध्ये माचाही सल्लागार समितीची पुर्नरचना करणे, पुर्नरचित सल्लागार समितीवर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करणे, सुरक्षारक्षक कामगार सल्लागार समितीची पुर्नरचना करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करून पुर्नरचित माथाडी मंडळांवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करणे, माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी गृह खात्याने संबंधितांची समिती गठीत करावी व पोलीस संरक्षण इत्यादी मागण्या आहेत. यादरम्यान माथाडी नेते नरेंद्र पाटीलांनी सभेत माथाडींना संबोधित करताना, मुख्यमंत्र्यांनी आज सह्याद्री अतिथी गृहावर माथाडींच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी पाचारण केले आहे. बैठक घेण्यात आली, तरी येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठका घेतल्या नाही, तर भव्य लढा उभारू, असा इशारा दिला.

हेही वाचा – नवी मुंबई : काही क्षणात दुचाकी चोरी करणाऱ्याला अटक, २३ दुचाकी जप्त

आ. शशिकांत शिंदेचा आझाद मैदानावर चलोचा नारा

माथाडी बोर्डात अनागोंदी कारभार सुरू आहे. माथाडी बोर्ड संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. कृषीविषयक कायदे शेतकरी आणि जनतेसाठी असावेत. परंतु, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. येत्या २७ फेब्रुवारीपासून अधिवेशन सुरू होत असून, सर्व बाजार घटकांनी आंदोलनात सहभागी व्हावे. निर्णय लागल्याशिवाय, न्याय मिळाल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा ईशारा देत आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे आव्हान आ. शशिकांत शिंदे यांनी

माथाडी कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री,उद्योग मंत्री, संबंधित विभागाचे प्रधान सचिव, पोलीस यंत्रणेचे अधिकारी, कामगार आयुक्त, माथाडी बोर्डाचे अधिकारी,युनियन प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. माथाडी कामगार नेते व महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील माथाडी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी माथाडी कामगारांचे सर्व प्रश्न सोडविले जातील असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.

केले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 16:30 IST
Next Story
नवी मुंबई : काही क्षणात दुचाकी चोरी करणाऱ्याला अटक, २३ दुचाकी जप्त