५० पेक्षा अधिक किलो वजन उचलण्यास माथाडींचा नकार; कांदा-बटाटा बाजारात माल पडून राहिल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान

नवी मुंबई : ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणी नसाव्यात, असे आदेश असतानाही त्याची कांदा-बटाटा बाजारात अंमलबजावणी होत नाही. वारंवार काम बंद आंदोलन करूनही एपीएमसी प्रशासन ठोस निर्णय घेत नाही, त्यामुळे माथाडींनी दोन दिवसांपासून अधिक वजनाच्या गोण्या उचलणे बंद केले आहे. परिणामी बाजारात वाहनांमध्येच माल पडून आहे. शंभरपेक्षा अधिक गाडय़ा खाली झालेल्या नाहीत.

माथाडींच्या या भूमिकेमुळे व्यापारी अडचणीत आल्याने त्यांनी इतर बाजार समितीतही हा निर्णय का लागू केला नाही? तिथूनच हा तोडगा काढला तर या ठिकाणी अधिक वजनााच्या गोण्या येणार नाहीत. विनाकारण व्यापाऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप केला आहे, तर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी व्यापारी जाणूनबुजून ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा माल आणत आहेत. ठोस निर्णय होईपर्यंत माथाडी वजन उचलणार नाहीत, असा इशाराही दिला आहे.

जानेवारी २०२० मध्ये केंद्र शासनाने ५० किलोपेक्षा अधिक वाजनाच्या गोणी नसाव्यात, असा आदेश दिला होता, तर एपीएमसी प्रशासनाने नोव्हेंबर २०२० पासून याची अंमलबजावणी करणे गरजेचे होते. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. याबाबत वारंवार माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. अनेकदा बैठकाही झाल्या आहेत. दीड वर्ष उलटून गेले तरी व्यापारी याची अंमलबजावणी करीत नसल्याने सोमवारपासून माथाडींनी ५० किलोपर्यंत वजन असलेल्या गोणीच उचलणार, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे बाजारात कांदा-बटाटय़ाच्या १०० गाडी माल वाहनांतच पडून आहे. बाजारात सोमवारी १५० वाहने आवक होती. त्यापैकी ४० वाहने, तर मंगळवारी ७० वाहनांतून माल खाली करण्यात आलेला नाही.

गेल्या दीड वर्षांपूर्वी ५० किलोपेक्षा जास्त वजन न उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अजूनही व्यापारी ५० किलोहून अधिक वजनाच्या गोणीच बाजारात आणत आहेत. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना याबाबत सांगून बाजारात ५० किलोच्या गोणी येणे अपेक्षित आहे, मात्र व्यापारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. तोर्प्यत माथाडी कर्मचारी केवळ ५० किलोपर्यंतच्या गोणी उचलतील.

नरेंद्र पाटील, माथाडी नेते

एपीएमसी प्रशासनाने ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी असलेल्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही, याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिलेल्या आहेत. मात्र तरी जास्त वजनाच्या गोणी येत आहेत. मात्र यावर राज्य सरकार, पणन मंडळाकडूनच तोडगा निघेल.

विठ्ठल राठोड, उपसचिव, कांदा बटाटा बाजार

५० किलोपेक्षा अधिक वजन नसावे, हा आदेश केंद्र सरकारने काढला असून इतर बाजार समितीत हा आदेश लागू करण्यात आलेला नाही. एपीएमसी बाजारात पुणे, नाशिक, अहमदनगर येथून शेतमालाची गाडी येत असते. त्यामुळे आधी त्या बाजार समितीतही हा निर्णय लागू करावा म्हणजे या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होईल. मात्र केवळ याच बाजार समितीत हा आदेश लागू करून व्यापाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. आज बाजारात १००-११० गाडी माल बाजार आवारातच उभा आहे.

अशोक वाळुंज, संचालक, कांदा बटाटा बाजार समिती