नवी मुंबई महापौर निवडणुकीची केवळ औपचारिकता राहिल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक जे.डी. सुतार यांचा शहराचे तेरावे महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्या दोन नगरसेविकांनी  उमेदवारी अर्ज भरल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. यातील पक्षाच्या अधिकृत उमेदवार मंदाकिनी म्हात्रे असून त्यांच्या विरोधात पक्षाचे येथील स्थानिक अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी बंडखोरी केली आहे. यापैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूकही औपाचारिकता ठरणार आहे पण दोन्ही उमेदवार इरेला पेटल्याने ही निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

नवी मुंबई महापौर निवडणूक गुरुवारी दुपारी होणार आहे. शिवसेनेचे विजय चौगुले हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार म्हणून कमालीची रंगत निर्माण झाली होती मात्र भाजपने आपल्या सहा नगरसेवकांचा पाठिंबा देणार नाही असे जाहीर केल्याने या निवडणुकीतील रंगत कमी झाली आहे. या निमित्ताने कोटय़वधी रुपयांचा घोडेबाजार गेल्या दोन महिन्यात झाला होता, मात्र चौगुले यांच्या माघारीमुळे राष्ट्रवादीचा महापौर होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. त्यानंतर होणाऱ्या उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला पाठिंबा देणार यावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. या निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या पत्नी मंदाकिनी म्हात्रे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष दशरथ भगत नाराज असून त्यांनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरविले आहे. ३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारासह भगत कुटुंबातील दोन नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी चव्हाण यांना भेटल्याचे समजते. गेली सात वर्षे पक्षवाढीचे काम करून पालिकेतील सत्तेत सहभागी होण्याइतपत यश मिळविलेल्या कार्यकर्त्यांना हेच फळ दिले जाते का, असा सवाल या कुटुंबाने चव्हाण यांना केला आहे. माझे चांगले घर बांधण्याऐवजी पक्षाचे वाशी येथील कार्यालय बांधण्यास प्राधान्य देणे ही चूक आहे का, असा सवाल भगत यांनी केल्याचे समजते. भगत कुटुंबाच्या या भावनिक प्रश्नांवर प्रदेशाध्यक्ष काही काळ निरुत्तर झाले. त्यामुळे म्हात्रे यांच्या उमेदवारीवर फेरविचार होण्याची शक्यता आहे. हा फेरविचार न झाल्यास जेमतेम दोन अंकी नगरसेवकांची संख्या असलेला हा पक्ष फुटीच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे.

महापौर निवडणुकीसाठी शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. जे.डी. सुतार यांना साठपेक्षा जास्त नगरसेवकांचा पाठिंबा मिळणार आहे. हात उंच करून मतदान करण्याची प्रक्रिया असल्याने ही निवड लागलीच होणार आहे. त्यानंतर होणाऱ्या उपमहापौर निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.