दूरसंचार विभागाकडूनही परवानगी; आता अंतिम सुरक्षा चाचणी

नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्रमांक १ वर नुकतीच ऑसिलेशन चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता मेट्रो धावण्यासाठी महत्त्वाची असलेली केंद्रीय दूरसंचार विभागाची परवानगी (डायनॅमिक क्लिअरन्स प्रमाणपत्र) मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.

सिडकोकडून नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण चार मार्ग साकारण्यात येत आहेत.  यात बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटरच्या मार्ग क्रमांक १ वर धावणाऱ्या मेट्रोची आरडीएसओ (रिसर्च डिझाइन अण्ड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच ऑसिलेशन चाचणी घेण्यात आली.

सदर मेट्रो मार्गाचे विद्युतीकरण करण्यासंदर्भात केंद्रीय

दूरसंचार विभागाकडून या मार्गावरील स्थानक क्रमांक १ ते १० या

भागाची पाहणी करण्यात येऊन ‘डायनॅमिक क्लिअरन्स’ प्रमाणपत्र आता देण्यात आले आहे.  पुढील टप्प्यात मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्या देखरेखीखाली वाणिज्यिक परिचालन चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे.

डायनॅमिक क्लिअरन्स प्रमाणपत्र आणि सेफ्टी केस प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पामधील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. यानंतर ‘आयएसए’ प्रमाणपत्र प्राप्त करण्यात येईल. त्यापुढील टप्प्यात ‘आरडीएसओ’चे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वाणिज्यिक परिचालन चाचणी घेण्यात येईल.

डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको