पनवेल : कामोठे येथील महात्मा गांधी मीशन (एमजीएम) वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या स्किल्स लॅबला वैद्यकीय प्रशिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातील योगदानासाठी ‘एफआयसीसीआय हेल्थकेअर एक्सलन्स पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण आणि कौशल्य विकास उपक्रम’ या विभागात हा पुरस्कार देण्यात आला. स्किल्स लॅबचे संचालक डॉ. विश्वास साठे यांनी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

एफआयसीसीआय हेल्थकेअर पुरस्कारांचे हे १८ वे वर्ष होते. दिवंगत डॉ. समीर कदम यांनी स्थापन केलेल्या एमजीएम स्किल्स लॅबने वैद्यकीय शिक्षण, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि कॅडव्हर प्रशिक्षण क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या केंद्राला अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए), अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन्स (एसीएस) आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स, यूके यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांची मान्यता मिळाली आहे. तसेच एमआरसीपीसीएच आणि एमआरसीएस या आंतरराष्ट्रीय परीक्षांसाठी अधिकृत केंद्र म्हणूनही ते कार्यरत आहे.

एमजीएम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हे एएचएकडून ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह चेस्ट पेन सेंटर’ आणि ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक सेंटर’ म्हणून प्रमाणित होणाऱ्या देशातील पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक आहे. हा पुरस्कार संस्थेतील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक योगदानाचा सन्मान असल्याचे आणि हा पुरस्कार दिवंगत डॉ. समीर कदम यांना समर्पित करण्यात आल्याचे यावेळी एमजीएम स्किल्स लॅबचे संचालक डॉ. विश्वास साठे यांनी घोषित केले.