८०० झोपडय़ांवर कारवाईं
दिघ्याच्या यादवनगरमधील बेकायदा झोपडय़ांवर एमआयडीसीच्या अतिक्रमण पथकाने मंगळवारी कारवाई केल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी एमआयडीसीच्या भूखंडावरील ८०० झोपडय़ांवर कारवाई करीत ५ हजार चौरस मीटरचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला.
दिघा येथील ९४ अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या इमारतींवर हातोडा पडला असून उत्सवी काळामुळे एक डिसेंबपर्यंत ही कारवाई थांबविण्यात आली आहे. मात्र एमआयडीसीच्या अतिक्रमण पथकाने आपला मोर्चा आता झोपडपट्टी भागाकडे वळवला असून यादवनगर येथे एमआयडीसी जागेवर थाटण्यात आलेल्या झोपडय़ा तसेच भंगाराची दुकाने मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये विनापरवाना बांधण्यात आलेली प्रार्थनास्थळे जमीनदोस्त करत उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली बांधण्यात आलेल्या झोपडय़ा हटवण्यात आल्या. या संदर्भात एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश माळी म्हणाले की, या मोकळ्या राखीव भूखंडावर कुंपण टाकण्यात येणार असून त्याच्या विक्रीची निविदा काढण्यात येईल.
झोपडपट्टीदादा फरार
विष्णुनगर, यादवनगर येथील भू-माफिया कारवाईदरम्यान राजकीय नेत्यांना हाताशी धरत कारवाईमध्ये खो घालत असत. परंतु आता उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने सर्वाचे धाबे दणाणले आहेत. मंगळवारी झालेल्या या कारवाईदरम्यान हे झोपडपट्टीदादा फरार झाले होते, मात्र त्यांनी आमच्यावर राजकीय नेत्यांचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.