नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठा अैाद्योगिक पट्टा अशी ओळख असणाऱ्या ठाणे-बेलापूर अैाद्योगिक पट्ट्यातील अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) युद्धपातळीवर उपाय आखण्यास सुरुवात केली आहे.

इतक्या मोठ्या अैाद्योगिक पट्ट्यात ये-जा करणारी अवजड वाहने उभी करण्यासाठी अजूनही पुरेशी व्यवस्था नाही. येथील उद्योजकांनी आग्रह धरल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागात सुसज्ज अशा ट्रक टर्मिनलची उभारणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ऐरोली येथील इलठणपाडा आणि तुर्भे एमआयडीसी भागात सुसज्ज असे ट्रक टर्मिनल लवकरच सुरू केले जाणार आहे.

ठाणे-बेलापूर रस्त्याच्या पूर्व बाजूस २३३३.२७ हेक्टर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रात एमआयडीसीने ठाणे-बेलापूर अैाद्योगिक क्षेत्र विकसित केले आहे. या क्षेत्रात ए,सी,डी,आर,के आणि ई-एल अशा वेगवेगळ्या ब्लाॅकचा समावेश करण्यात आला आहे. या अैाद्योगिक क्षेत्रात सहा हजारांहून अधिक लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांची उभारणी झाली आहे.

तसेच येत्या काळात याच भागात आणखी नवे उद्योग उभे रहात आहेत तसेच विस्तारत आहेत. रासायनिक, पेट्रोकेमिकल्स, अैाषध निर्माण अभियांत्रिकी, शीतगृह, माहिती तंत्रज्ञान यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग येथे कार्यरत आहेत. या अैाद्योगिक क्षेत्रात जवाहरलाल नेहरू बंदर, पुणे, मुंबई तसेच देशातील वेगवेगळ्या भागातून माल वाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. यातील बरीचशी वाहने ही याच भागात मुक्कामासाठी असतात.

इतक्या मोठया अैाद्योगिक पट्ट्यात एमआयडीसीने अजूनही ट्रक टर्मिनल विकसित केलेले नाही. त्यामुळे या भागात येणारी अवजड वाहने ही रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे हा संपूर्ण पट्टा वारंवार वाहतूक कोंडीत सापडलेला दिसतो.

देशातील सर्वात मोठ्या अशा या अैाद्योगिक पट्ट्यात येत्या काळातही अवजड वाहनांची ये-जा वाढेल अशीच चिन्हे आहेत. हा भाग नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरी भागांनाही लागून आहे. त्यामुळे या भागात काम करण्यास येणारे कामगार तसेच नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली यासारख्या भागातून ये-जा करणाऱ्या हलक्या वाहनांची संख्याही येथे बरीच मोठी आहे. दुतर्फा उभी रहाणारी अवजड वाहने तसेच दररोज या भागात वाढणाऱ्या हलक्या वाहनांमुळे येथील वाहतुकीचे तीनतेरा वाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हे लक्षात घेऊन यासंबंधी एमआयडीसी प्रशासन आणि स्थानिक वाहतूक पोलिसांनी तातडीने उपायांची आखणी सुरू केली आहे.

दोन ठिकाणी मोठे ट्रक थांबे

  • ठाणे-बेलापूर अैाद्योगिक पट्टयातील उद्योजकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते.
  • या बैठकीत उद्योजकांच्या संघटनेने ट्रक टर्मिनल अभावी या भागात निर्माण होत असलेल्या वाहतुकीच्या समस्यांची माहिती दिली होती. त्यावर अवजड वाहने उभी करण्यासाठी तातडीने व्यवस्था उभी करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले होते.
  • एमआयडीसी प्रशासनाने या आदेशाची वेगाने अंमलबजावणी सुरू केली असून दिघा-ऐरोली भागातील इलठणपाडा आणि तुर्भे येथील डी ब्लाॅकमध्ये ट्र्क टर्मिनल उभारण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारसू यांनी दिली.
  • इलठणपाडा येथे टर्मिनस उभारणीसाठी ११० कोटी तर तुर्भे येथील डी ब्लाॅकमध्ये हे काम करण्यासाठी ९५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला यापूर्वीच मान्यता दिली आहे. यापैकी तुर्भे येथील ट्रक टर्मिनसचे काम अंतिम पूर्ण झाले असून स्थानिक वाहतूक पोलिसांनी ते सुरू करण्याची मागणी एमआयडीसीकडे केली आहे. हे टर्मिनस लवकरच सुरू केले जाईल, असे एमआयडीसीने स्पष्ट केले आहे.
  • या दोन महत्वाच्या टर्मिनलमुळे एमआयडीसी भागात अवजड वाहनांच्या थांब्याचा मोठा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा ठाणे-बेलापूर अैाद्योगिक संघटनेने केला आहे.