पनवेल – महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने दिलेल्या निर्भया पथकाच्या सरकारी वाहनाचा गैरवापर झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील खारघर येथे घडली आहे. मध्यरात्री बेलपाडा परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित तरुणाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोमवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सूमारास खारघरच्या बेलपाडा परिसरातील एका चौकात निर्भया पथकाच्या पोलीस गाडीतून विना गणवेश एक युवक चालक त्यामधून उतरला. वाहनातील तरूण हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय सुरूवातीला जवळच्या नागरिकांना आला. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्याला हटकले. मात्र त्याने अरेरावी करत स्वतःला पोलिस विभागाशी संबंधित असल्याचे सांगितले आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांशी वाद घालत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. काहींशी किरकोळ धक्काबुक्कीही झाल्याने परिसरात भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून नागरिकांनी धाडस दाखवत त्या युवकाला पुन्हा गाडीत बसण्यापूर्वीच पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर संतापाची लाट उसळली.या प्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी घेतली. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर संबंधित युवक हा खारघर पोलीस ठाण्यात स्वच्छतेचे काम करत असल्याचे उघड झाले. राम नंदू पवार (वय २१) असे त्याचे नाव असून, तो वारंवार ठाण्यात येत असल्याने वाहन उभे करण्याची जागा आणि किल्ली ठेवण्याचे ठिकाण याची त्याला माहिती होती, असे प्राथमिक तपासात समोर आले.
राम पवार याच्याविरोधात बीएनएस कलम ३१४ तसेच सरकारी वाहनाचा अपहार, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणे आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे अशा विविध गुन्ह्यांखाली खारघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. संबंधित वाहन पोलिसाच्या ताब्यात होते, की ठाण्याच्या आवारात उभे केल्यानंतर राम पवार याने वाहन पळवले याची चौकशी पोलीस करत आहेत. राम हे वाहन घेऊन किती वाजता पोलीस ठाण्यातून गेला, त्याने मद्यपान कुठे केले, त्याच्यासोबत पोलीस कर्मचारी होते का याची सुद्धा चौकशी पोलीस करीत आहेत.
